अत्याधुनिक सोईसुविधांची स्मार्टफोनमध्ये भर पडताना दिसते. आता तर फाईव्ह जी तंत्रज्ञान या स्मार्ट फोनमध्ये आले आहे. त्यामुळे इंटरनेटचे स्मार्टफोनमधील स्पीड वाढले आहे. हे तंत्रज्ञान सुपरसॉनिक तंत्रज्ञान असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे स्मार्ट फोन वापरणाऱ्यांना वेगळाच आनंदानुभव मिळणार आहे.
करमणुकीच्या क्षेत्राने आता आपल्या खिशात जागा पक्की केली आहे. पूर्वी चित्रपट गृहे, नाट्यगृहे त्यानंतर व्हिडिओ पार्लर मग टीव्ही आणि आता स्मार्टफोन हेच बहुतांश लोकांचे करमणुकीचे साधन झाले आहे. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात सुरू असल्याने या स्मार्टफोनला तर एवढा भाव आला की जवळ-जवळ सर्वच व्यवहार या स्मार्टफोनच्या माध्यमातून करायला मानवाला शिकावे लागले. एकाकाळी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाला मोबाईलपासून दूर राहा असा सल्ला दिला जायचा. आता मात्र संपूर्ण शिक्षणच मोबाईलवर मिळू लागले किंबहुना घ्यावे लागले. त्यामुळे यावर्षी दसऱ्याला पाटीपूजनाऐवजी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या स्मार्टफोनचे पूजन केले.
...आणि मोबाईल फोनचा बोलबाला झाला -
आधुनिकीकरणाच्या युगात अनेक जुन्या गोष्टी मागे पडत चालल्या आहेत. त्याचवेळी त्यांची जागा अनेक नव्या गोष्टी घेत आहेत. त्या अधिक परवडणाऱ्या तसेच वापरायला सोप्या म्हणजेच यूजर फ्रेंडली असल्याने त्यांचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या गोष्टींच्या वापराचा वेगही यापूर्वी कधीही नव्हता एवढा वाढला आहे. नव्वदच्या दशकात याचा पहिला अनुभव आपल्याला आला. तो म्हणजे देशात पेजरचे आगमन. त्यावर तुम्हाला कुणी संपर्क साधू इच्छित असेल त्याचा फोन नंबर पाठवण्याची सोय होती. तसा नंबर तुमच्याकडे आला की तुम्ही त्या नंबरवर फोन करुन बोलू शकत होता. हे तंत्रज्ञान आले. मात्र ते रुळायच्या आत मोबाईल फोनचा बोलबाला सुरू झाला. तो एवढ्या वेगाने झाला की पेजर नावाचे काहीतरी तंत्रज्ञान साधन आले होते हे आता बहुतांश लोकांना आठवतही नसेल.
फोनमध्ये ऑडिओसह व्हिडिओ कॉलही आला -
मोबाईल फोनमध्येही सुरुवातीला सीडीएमए आणि नंतर जीएसएम तंत्रज्ञान यांचा बोलबाला होता. इनकमिंग कॉलसाठीही त्यावेळी मोबाईल धारकाला पैसे मोजावे लागत होते. मात्र ग्राहक संख्या जसजशी वाढू लागली, तसे मोबाईल फोनचे जाळेही विस्तारत गेले. त्याचे दर झपाट्याने कमी झाले. सुरुवातीला मोबाईलवरुन एसएमएस करण्याची आणि फोन करण्याची सोय होती. त्यातही प्रगती झाली. एसएमएस बरोबरच एमएमएस पाठवण्याची सोयही मोबाईलमध्ये झाली. या गोष्टी एवढ्या वेगाने होत होत्या, की त्या वेगवेगळ्या आहेत. तसेच त्यामध्ये सतत आधुनिकीकरण होत आहे, हेच समजेनासे झाले. हा सगळा टू जीचा जमाना होता. त्यानंतर आले ते थ्री जी तंत्रज्ञान. हे यायला जरा उशिरच लागला मात्र या तंत्रज्ञानाने याच क्षेत्रातील पुढील क्रांती केली. आपल्या फोनवरुन व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा या थ्री जी तंत्रज्ञानाने मिळाली. त्यावेळी भारतात सॅमसंग आणि तत्कालीन सोनी-एरिक्सन अशा कंपन्यांनी पहिल्यांदाच असे फ्रंट कॅमेरावाले थ्रीजी फोन लाँच केले होते. महाभारतातील संजय आणि धृतराष्ट्रातील संवादामध्ये युद्धभूमिवरील सर्व हकीकत संजय आपल्या दिव्य दृष्टीने धृतराष्ट्राला सांगतो याचा उल्लेख आहे. अगदी तसाच फील असा फोन लावल्यावर यायचा. त्यावेळी अशा फोनचं खूपच अप्रुप होतं. याचं दुसरं वैशिष्ठ्य म्हणजे या फोनसाठी इंटरनेट डाटाची गरज नव्हती. नेहमीप्रमाणेच ऑडिओ कॉलऐवजी व्हिडिओ कॉल लावता येत होता.
फोर जी म्हणजे मोबाईल क्षेत्रातील सर्वव्यापी क्रांती -
यानंतर आले ते फोर जी तंत्रज्ञान. ही मोबाईल फोनच्या क्षेत्रातील मोठी आणि सर्वव्यापी क्रांती होती. या तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने कर लो दुनिया मुठ्ठी में.. ही उक्ती सार्थ केली. आता हँडसेट फक्त मोबाईल फोन एवढा मर्यादित राहिला नाही. तर तो स्मार्ट फोन झाला. यामध्ये कॉल करण्यापासून इंटरनेटच्या माध्यमातून मिळणाऱ्या सर्व सुविधा स्मार्टफोनवर उपलब्ध झाल्या. त्यामुळे संपूर्ण जग आपल्या हाती आल्याचा अनुभव हे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना येत होता. सुरुवातीच्या काळात अशा स्मार्ट फोनच्या किंमती खूप जास्त होत्या. सर्वसामान्यांना ते परवडणारे नव्हते. मात्र ही परिस्थितीही फार काळ टिकली नाही. अगदी स्वस्तात विविध कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात मिळू लागले. त्यामुळे कॉल, एसएमएसपासून व्हिडिओ कॉल मेल विविध साईट्स पाहणे, यूटूबचे व्हिडिओ पाहणे अशा गोष्टी लोक सहजतेने करु लागले. सर्वच आर्थिक व्यवहारही फोनवरुन होऊ लागले. मोठ-मोठ्या गुंतवणुकीपासून अगदी भाजीवाल्यापर्यंत सगळ्यांना पैशाचे व्यवहार स्मार्टफोनच्या माध्यमातून होऊ लागले आहेत. एवढेच नव्हे तर नंदीबैलवालेही त्यांच्या बैलाच्या माथ्यावर पेमेंट अॅपचा क्यूआर कोड अडकवून दक्षिणा घेऊ लागले आहेत. मोबाईल नंबरशिवाय आता कशाचेही पान हलत नाही, हे काही वेगळे सांगायची गरज नाही.
फाईव्ह जी सुपरफास्ट क्रांती घडवणार -
त्यानंतर स्मार्ट फोनची विविध कंपन्यांच्या वेगवेगळ्या मॉडेलची एवढी रेलचेल बाजारपेठेत झाली की आता दर काही दिवसांनी एखादी तरी कंपनी आपल्या स्मार्टफोनचं नवीन व्हर्जन बाजारात आणताना आपण पाहतो. त्यामध्ये अत्याधुनिक सोईसुविधांची नेहमीच भर पडताना दिसते. आता तर फाईव्ह जी तंत्रज्ञान या स्मार्ट फोनमध्ये आले आहे. त्यामुळे इंटरनेटचे स्मार्टफोनमधील स्पीड वाढले आहे. हे तंत्रज्ञान सुपरसॉनिक तंत्रज्ञान असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे स्मार्ट फोन वापरणाऱ्यांना वेगळाच आनंदानुभव मिळणार आहे. फाईव्ह जी म्हणजे सीमलेस सर्वकाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हेच तंत्रज्ञान आगामी काळात मानवाच्या करमणूक आणि कामाच्या सर्वच क्षेत्रात सुपरफास्ट क्रांती घडवणार आहे. या नव्या युगाचे स्वागत करण्यास तयार होऊया..
- अभ्युदय रेळेकर