आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत आणि नोकरी
चंदीगड, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या ७६ जणांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती व्यक्त केली असून या शेतकर्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली आहे.
फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ही घोषणा केली. केंद्र सरकारने राज्यांचा सल्ला घेतल्याशिवाय हे कायदे बनवले आहेत. तर शेती हा राज्यांचा विषय आहे आणि त्यावर कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. यामुळे थंडी, ऊन, पाऊस याची पर्वा न करता शेतकरी गेल्या चार महिन्यांपासून आपल्या जमिनी वाचवण्यासाठी लढा देत आहेत, असं अमरिंदर सिंग म्हणाले.
हे तीन कृषी कायदे लागू करून केंद्र सरकारला बाजार समित्या फोडायच्या आहेत, एमएसपी यंत्रणा बंद करायची आहे. आधीच दोन पिकांना एमएसपी मिळतो. जर ते देखील खुल्या बाजाराच्या हवाली करण्यात आले तर मक्यासह इतर पिकांची जी अवस्था आहे, तशी स्थिती होईल, असा आरोप त्यांनी केला.