१८ दिवसांत ८२ करोनाबळींवर अंत्यसंस्कार; पालिकेच्या लेखी केवळ १८ मृत्यूंची नोंद
सागर नरेकर, लोकसत्ता]
बदलापूर : करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना रुग्ण दगावण्याचे प्रमाण नगण्य असल्याचा दावा करणाऱ्या कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे पितळ उघडे पडले आहे. शहरात गेल्या १८ दिवसांत १८ मृत्यू झाल्याचे पालिकेने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात शहरात या कालावधीत ८२हून अधिक जणांनी करोनामुळे प्राण गमावल्याचे समोर येत आहे. पालिकेतर्फे करोनाबळींवर करण्यात येणाऱ्या अंत्यसंस्काराच्या आकडेवारीतूनच ही बाब समोर आली आहे.
शहरातील सर्वात मोठय़ा मांजर्ली स्मशानभूमीत गेल्या १८ दिवसांत २२४ मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून येथील नोंदवहीनुसार त्यातील ३७ रुग्ण एकटय़ा पालिकेच्या गौरी सभागृहातील कोविड रुग्णालयातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मृतांच्या आकडेवारीत पालिका प्रशासन लपवाछपवी करत असल्याची बाब समोर येते आहे.
महिनाभरात तब्बल पाच हजार ७७४ रुग्ण आढळून आले आहेत. सरासरी १९३ रुग्ण दररोज वाढत असतानाही शहरात मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचा दावा नगरपालिका प्रशासनाकडून केला जात होता. नगरपालिका क्षेत्रात मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात कमी म्हणजे एवघा एक टक्का मृत्युदर नोंदवला होता. मात्र मांजर्ली स्मशानभूमीत गेल्या १८ दिवसांत तब्बल २२४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच स्मशानभूमीत गेल्या १८ दिवसांत बदलापुरातील ८२ करोनामृतांना अग्नी देण्यात आला. यात बदलापूर शहरातील नगरपालिका संचालित गौरी सभागृह रुग्णालयातील रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचेही स्मशानातील नोंदवहीतून समोर आले आहे. तर शहरातील आशीर्वाद, सेंट्रल, सेव्हन पाम या रुग्णालयांतूनही मृत्यू झालेल्या मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बदलापूर शहराव्यतिरिक्त अन्य कोविड रुग्णालयांमधूनही येथे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आणले गेले. मात्र यातील ९५ टक्के मृतदेह हे बदलापूर शहरातीलच असल्याचे यादीवरून दिसते.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या दफ्तरी मात्र, या काळात अवघ्या १८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यातही २ एप्रिल ते १९ एप्रिल या दरम्यान अवघ्या १० मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. तर २० एप्रिल रोजी पालिकेने आपल्या करोना वार्तापत्रात ६ एप्रिल ते १४ एप्रिल काळातील ८ मृत्यूंची नोंद केली आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत मृतांचा आकडा १४९ वर पोहोचला होता. त्यामुळे पालिका प्रशासन मृतांच्या आकडेवारीची लपवाछपवी तर करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
अनेक मृत्यूंची नोंदच नाही
कोणत्याही स्मशानभूमीत मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृत्यू दाखला सादर करावा लागतो. त्याची नोंद स्मशानभूमीतील नोंदवहीत होत असते. या नोंदवहीची माहिती जरी पालिकेने मृतांची नोंद ठेवण्यासाठी घेतल्यास मृतांचा आकडा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र अशी कोणतीही यंत्रणा सध्या बदलापुरात कार्यरत नाही. त्यामुळे शहरातल्या अनेक मृत्यूंची नोंदच अद्याप पालिकेकडे झाली नसल्याचे समोर आले आहे.
मृत्यूंची माहिती खासगी रुग्णालयांकडून मिळण्यात अनेकदा उशीर होतो. त्यामुळे पालिकेच्या आकडेवारीत ती संख्या दिसून येत नाही. मृतांची यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.
– दीपक पुजारी, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका.