संकट उंबरठ्यावर आहे, त्याला परतवून लावणे ही काळाची गरज;जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आवाहन...
मुंबई दि. २२ एप्रिल - विदर्भ सिंचन विकास महामंडळाने नागपूर कॉन्टॅक्टर असोसिएशन व डॉ. दंदे फाऊंडेशन यांच्या मदतीने नागपूर आजनी येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रात १०० बेड्सचे मोफत कोविड केअर सेंटर उभारले असून हे कोविड केअर सेंटर आजपासून रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यांनी दिली.
राज्यभरात कोरोनाने थैमान घातले असताना हे कोविड केअर सेंटर अनेक रुग्णांना दिलासा देण्याचे काम करेल याबाबत मला विश्वास आहे. सर्वांनी प्रयत्न केले तर आपण या परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
देशभरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर परिस्थिती किती गंभीर आहे हे दिसून येते आहे त्यामुळे आपण सर्वांनी मानवतावादी दृष्टीकोन ठेवून काम करायला हवं. संकट उंबरठ्यावर आहे, त्याला परतवून लावणे ही काळाची गरज आहे. जे सढळ हाताने मदत करत आहेत अशा सर्वांचेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.