“मला तेवढाच उद्योग नाही,” पार्थ पवारांच्या ‘त्या’ ट्विटवर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला असून त्यांच्या या भूमिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत असताना त्यांना यासंबंधी विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी प्रत्येकाला काय ट्विट करावं याचा अधिकार असतो असं सांगत ही राष्ट्रवादीची भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं.

“ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही हे आम्ही सांगितलेलं आहे. अलीकडची मुलं काही ट्विट करतात. प्रत्येक वेळेस तुमच्या मुलाने हे ट्विट केलं विचारलं जातं, मला तेवढाच उद्योग नाही. राज्यातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत,” असं अजित पवारांनी म्हटलं.

पुढे त्यांनी सांगितलं की, “जो तो स्वतंत्र विचाराचा असतो, प्रत्येकाला काय ट्विट करावं याचा अधिकार असतो. माझी बहिण खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण किंवा इतर घटकांचं आरक्षण असेल ज्याला त्याला आपल्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे”.

पार्थ पवारांनी काय भूमिका मांडली आहे
बीडमधील तरुणाच्या आत्महत्येनंतर पार्थ पवार यांनी ट्विट केलं होतं. “मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याची बातमी ऐकून धक्का बसला आहे. अशा दुर्दैवी घटनांची मालिका सुरु होण्याआधी मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि लढावं. महाराष्ट्र सरकारने तोडगा काढण्यासाठी पावलं उचलावीत,” अशी विनंती त्यांनी केली.


पुढे ते म्हणाले होते की, ““विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नाही. मराठा आंदोलनाची धगधगती मशाल ह्रदयात ठेवून विवेक तसंच इतर अनेक लाखो तरुणांसाठी न्यायाची मागणी करण्यास मी तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र”.

Comments : 0


    No Comments

Leave a comment