प्रतिनिधी, १४ मे २०२२ :- देशातील वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज ठाण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं. महागाईचा भस्मासुर, पगार कपात, नोकरी जाण्याची भीती, इंधन दरवाढ अशा आशयाचे फलक झळकवत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. ठाण्यातील शासकीय विश्रामगृह परिसरात करण्यात आलेल्या या आंदोलनात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादीच्या ठाणे विभागीय महिला अध्यक्षा ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल – डिझेलसह घरगुती आणि व्यवसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. सिलेंडरच्या दरवाढीमुळे गृहिणीचे आर्थिक गणित कोलमडलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इंधनाबरोबरच सिलिंडरच्या दरातही कपात करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेक नागरिकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. अशातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी होत असल्याचं ऋता आव्हाड यांनी यावेळी सांगितले. तसेच केंद्र शासनाकडून उज्ज्वला योजनेचा खूप गाजावाजा करण्यात आला होता. प्रत्यक्षात या योजनेमध्ये जेवढ्या लोकांना अनुदान मिळालं, ते सर्वच लोक आता इंधन दरवाढीमुळे पुन्हा चुलीवर स्वयंपाक करू लागले आहेत, असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावला.