करोनाच्या लाटेमुळे अमेरिकन विद्यापीठांच्या लसीकरण धोरणामुळे भारतासह परदेशी विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. ज्यांनी भारत बायोटेकची कोवॅक्सिन किंवा रशियन स्पुटनिक व्ही लस घेतली आहे अशा भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा लसीकरण करण्याचे आदेश अमेरिकेतील विद्यापीठांनी दिले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता न मिळालेल्या लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा लसीकरण करावे असे अमेरिकेतील विद्यापीठांनी सांगितले आहे. विद्यापिठांनी या लसींची कार्यक्षमता आणि सुरक्षिततेविषयी माहिती नसल्याचे कारण देत संबंधित विद्यार्थ्यांना पुढील सत्र सुरु होण्यापूर्वी पुन्हा लसीकरण करण्याचे सांगितले आहे. यामध्ये अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे ज्यांनी भारत बायोटेकची कोवॅक्सिन किंवा रशियाची स्पुटनिक व्ही लस घेतली आहे.
विद्यापीठांच्या या आदेशानंतर दोन वेगळ्या लसी घेतल्याने काही परिणाम तर होणार नाही ना असा प्रश्न या विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. २५ वर्षांच्या मिलोनी दोशीने कोलंबिया यूनिवर्सिटी स्कूल ऑफ इंटरनेशनल आणि पब्लिक अफेयर्स येथे प्रवेश घेतला आहे. भारतात तिने कोवॅक्सिन लसीचे दोन डोस घेतले होते. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार विद्यापीठाने तिला पुन्हा लसीकरण करण्यास सांगितले आहे.
“मला दोन वेगळ्या लसी घेण्याची चिंता आहे. विद्यापीठाने सांगितले की अर्जाची प्रक्रिया ही सर्वात कठीण भाग असेल, पण खरोखरच या सर्व गोष्टी चिंताजनक ठरल्या आहेत,” असे मिलोनी दोशीने सांगितले.
नक्की पाहा >> कशासाठी परदेशी जाण्यासाठी… पहाटे चार वाजल्यापासून तरुणांची लसीकरण केंद्रावर गर्दी
“कोविड -१९ लसी या अदलाबदल करण्यायोग्य नाहीत, दोन वेगवेगळ्या लसी घेतल्यानंतरच्या सुरक्षिततेचा आणि परिणामकारकतेचा अभ्यास केला गेला नाही,” असे रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राचे प्रवक्ते (सीडीसी) क्रिस्टन नॉर्डलंड यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले. ज्यांनी याआधी आरोग्य संघटनेची मान्यता नसलेल्या लस घेतल्या आहेत त्यांना इथे मान्यताप्रात्प लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवस थांबावे लागणार आहे असे नॉर्डलंड म्हणाले.जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत अमेरिकेतील औषधनिर्माण संस्थाच्या फायझर इंक, मॉडर्ना इंक आणि जॉनसन व जॉन्सन यांनी तयार केलेल्या लसींचा मान्यता दिली आहे. दरवर्षी सुमारे २ लाख भारतीय विद्यार्थी अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात. त्यापैकी बर्याचजणांना आता विद्यापीठांनी मंजूर केलेल्या लसींसाठी वेळापत्रक तयार करणे अवघड जात आहे. या नव्या नियमामुळे त्यांच्या पुढील शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.