संपूर्ण जगाला ज्या करोना संकटाचा सामना करावा लागत आहे त्याची सुरुवात नेमकी कुठून झाली हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून करोनाची उत्पत्ती झाल्याचे दावे केले जात असले तरी अद्याप तसे कोणतेही ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. दरम्यान चीनमध्ये २०१२ मध्ये घडलेला एका घटनेने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि यासाठी पुण्यातील एक दांपत्य कारणीभूत ठरलं आहे. या घटनेचा करोनाच्या उत्पत्तीशी संबंध जोडला जात असून इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी याचा शोध घेण्यामागची कारणं उलगडली आहेत.
पुण्यात राहणारं वैज्ञानिक दांपत्य डॉ. मोनाली राहलकर आणि डॉ. राहुल बाहुलीकर यांनी जगभरात लोकांना होणारी हेळसांड पाहता करोनाच्या उत्पन्नीचं कारण शोधण्यासाठी खोलपपर्यंत जाण्याचं आपण ठरवलं असं म्हटलं आहे. “लोकांना होणारा त्रास पाहता नेमकी या व्हायरसची सुरुवात कशी झाली यासाठी आम्ही उत्सुक आणि चिंताग्रस्त होतो. आम्ही करोनाशी संलग्न असणाऱ्या इतर व्हायरसचा (RATG13) शोध घेण्याची सुरुवात केली,” असं त्यांनी सांगितलं आहे.
चीनमधील मोजियांग येथील खाण आणि ते सहा कर्मचारीशोध सुरु असतानाच दक्षिण चीनमध्ये मोजियांग येथे वापरात नसलेल्या तांब्याच्या खाणीची काही कागदपत्रं त्यांच्या हाती लागली. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, २०१२ मध्ये सहा कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसाठी खाणीमध्ये अंडरग्राऊंड पाठवण्यात आलं होतं. या खाणीत मोठ्या प्रमाणात वटवाघुळांचा संचार होता.
समजून घ्या : करोना विषाणूची उत्पत्ती नक्की कुठे झाली?
यानंतर हे सहा कर्मचारी गंभीर आजारी पडले होते. यावेळी करोना रुग्णांमध्ये दिसणारी ताप, खोकला, रक्ताच्या गुठल्या अशी लक्षणं त्यांच्यात दिसत होती. याशिवाय थकवा, फुफ्फुसातील न्यूमोनिया ही लक्षणंही जाणवत होती. डॉक्टर मोनाली यांनी काही कर्मचाऱ्यांच्या फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. या सहापैकी तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
डॉक्टर मोनाली यांच्या म्हणण्यानुसार, “वटवाघूळांचं मलमूत्र हे स्पर्श झाल्यास हवेत मिश्रित होतं. त्याच्यावर पाय पडल्यास ते आसापासच्या वातावरणात एकत्र होतं ज्यामुळे हवा अॅलर्जिक होते आणि तिथे उपस्थित असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो”.
करोना विषाणू ही चीनचीच निर्मिती; शोधनिबंधातील दावा
डॉक्टर मोनाली यांनी सांगितल्यानुसार, जगभरातील करोना रुग्णांचे रेडिओलॉजिकल रिपोर्ट पाहिले असता मोजियांगमधील खाण कामगारांशी अत्यंत मिळते जुळते असल्याचं लक्षात येतं. सीटी स्कॅनलमध्येही हा साधर्म्यपणा जाणवत आहे. “मे २०२० मध्ये आम्ही यासंबंधी पेपर प्रसिद्ध केला होता. यानंतर ‘TheSeeker’ या ट्विटर युजरने आमच्याशी संपर्क साधला. त्यानेही शोध घेतला असता याच गोष्टी समोर आल्या होता. मोजियांगच्या खाणीमधील कामगारांना जाणवणाऱ्या लक्षणांची माहिती असणारा प्रबंध त्याने आमच्यासोबत शेअर केला,” अशी माहिती डॉक्टर मोनाली यांनी दिली आहे.
या सहा कामगारांना देण्यात आलेली औषधंदेखील करोना रुग्णांच्या उपचारांमध्ये वापरण्यात येत असलेल्या औषधांसारखीच होती असं डॉक्टर मोनाली यांनी सांगितलं आहे. या कर्मचाऱ्यांना बुरशीजन्य संक्रमण झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
डॉक्टर मोनाली आणि डॉक्टर राहुल यांनी ‘करोना डॉक्टर ऑफ चायना’ म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर झाँग यांचाही उल्लेख केला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खाणीतील सहा कर्मचाऱ्यांच्या केसचा अभ्यास केल्यानंतर व्हायरल संक्रमणमुळेच त्यांची ही स्थिती झाली होती असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.