उत्तर प्रदेशमधील आरोग्य विभागाने आग्रा येथील एका नामांकित रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या रुग्णालयाच्या मालकाचा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये त्याने २६ एप्रिल रोजी आपण रुग्णालयात अत्यावस्थ अवस्थेत ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा पाच मिनिटांसाठी बंद केल्याचा दावा केलाय. “कोण यामधून वाचू शकतं पाहण्यासाठी आपण हा प्रयोग केला,” असं हा मालक व्हिडीओ सांगताना दिसत आहे. या धक्कादायक घटनेनंतर करोनाबाधित आणि करोनाची बाधा न झालेल्या मात्र ऑक्सिजनवर असणाऱ्या २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत.
“इथे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होता. मोदीनगरमध्ये ऑक्सिजन उपलब्ध नव्हता. आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना डिस्चार्ज देतो घरी घेऊन जा त्यांना असं सांगत होतो पण कोणीही त्यासाठी तयार नव्हते. म्हणून मग मी एखाद्या मॉक ड्रीलप्रमाणे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. आम्ही २६ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता ऑक्सिजनचा पुरवठा पाच मिनिटांसाठी बंद केला. त्यानंतर २२ रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यांचं शरीर निळं पडू लागला. या प्रयोगामधून या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला नाही तर ते जगू शकणार नाही हे स्पष्ट झालं. त्यानंतर आम्ही अतिदक्षता विभागातील इतर ७४ रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन सिलेंडरची सोय करण्यास सांगितलं,” अशी माहिती व्हायरल व्हिडीओमध्ये पारस रुग्णालयाचा मालक असणाऱ्या अरिंजय जैन यांनी दिल्याचं दिसत आहे. राष्ट्रीय महामार्ग दोनवर हे रुग्णालय असून हा व्हिडीओ आता व्हायरल झालाय.
नक्की वाचा >> समजून घ्या : केंद्र सरकारच्या नवीन नियमानंतर Covishield आणि Covaxin च्या एका डोसची किंमत किती असणार?
यासंदर्भात आग्रा येथील मुख्य आरोग्य अधिकारी, डॉक्टर आर. सी. पांड्ये यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्यांनी, “आम्ही या व्हायरल व्हिडीओची दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आलीय,” अशी माहिती दिली. तसेच जैन यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना आपलं वक्तव्य चुकीच्या अर्थाने घेण्यात आल्याचा दावा केलाय. व्हायरल व्हिडीओमध्ये आपणच असल्याचं जैन यांनी मान्य केलं आहे.
“आम्ही कोणते रुग्ण क्रिटीकल अवस्थेत आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि त्यांना योग्य उपचार देण्यासाठी हे मॉक ड्रील केलं होतं. २६ एप्रिल रोजी करोनाचे चार तर २७ एप्रिल रोजी तीन रुग्ण दगावले,” असा दावा जैन यांनी केलीय. २२ जणांचा ऑक्सिजनच्या पुरवठ्या आभावी मृत्यू झाला का असा प्रश्न विचारला असता जैन यांनी, “मला अगदी योग्य आकडा ठाऊक नाही,” असं उत्तर दिलं. जिल्हाधिकारी प्रभू एन सिंग यांनी, “या रुग्णालयामध्ये मोठे आयसीयू वॉर्ड आहे. इतरांचा मृत्यू झाला असावा. आम्ही व्हिडीओची सत्यता पडताळून पाहत आहोत,” अशी माहिती दिली.
नक्की वाचा >> समजून घ्या : ५०० रुपयांमध्ये दोन डोस; सर्वात स्वस्त Corbevax लस इतर लसींपेक्षा वेगळी कशी?
आग्रा येथील जीवनी मंडी परिसरातील मयंक चावला यांच्या आजोबांचं या रुग्णालयामध्ये २६ एप्रिल रोजी निधन झालं. “त्या दिवशी पारस रुग्णालयामध्ये अनेक रुग्णांचं निधन झालं. क्रिटीकल अवस्थेत असणाऱ्या रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याचा दावा करणाऱ्या मालकाचा व्हिडीओ धक्कादायक आहे. ही हत्याच आहे. संबंधित यंत्रणांनी या मालकाविरोधात कारवाई करावी,” अशी मागणी चावला यांनी केलीय. आम्हाला या प्रकरणामध्ये कोणतीही अधिकृत तक्रार मिळालेली नाही असं पोलिसांनी म्हटलं आहे.