Coronavirus : जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. परंतु, जगभरातील काही देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी इंग्लंडमधील निर्बंध इतक्यात हटवले जाणार नाहीत, असं स्पष्ट केलं. तसेच हे निर्बंध साधारण एक महिन्यासाठी वाढवले असून 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन संदर्भातील सर्व निर्बंध लागू असणार आहेत. यापूर्वी लागू करण्यात आलेले निर्बंध 21 जून रोजी संपणार होते.
बोरिस जॉनसन यांनी बोलताना सांगितलं की, "कोरोना व्हायरसच्या डेल्टा स्ट्रेनमुळे संसर्गाचा दर आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढीमुळे चिंता वाढली आहे." बोरिस यांनी केलेल्या या घोषणेसोबत आता 'फ्रीडम डे' 19 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे.
जॉनसन यांनी पुढे बोलताना सांगितलं की, निर्बंध हटवण्यासाठी आणखी थोडी वाट पाहणं उत्तम ठरेल. तसेच त्यांनी आशा व्यक्त केली आहे की, 19 जुलै हा निर्बंधांचा अखेरचा दिवस असेल. पुढे बोलताना ते म्हणाले की, आता देशात 40 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यासाठी लसीकरण मोहीम आणखी जलद करणार आहोत.
ब्रिटनमध्ये शनिवारी 7738 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच 6 जूनपासून कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 47,868 इतकी झाली आहे. यामध्ये गेल्या सात दिवसांत 52.5 टक्के रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. शनिवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 28 दिवसांत 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सौदी अरेबियामध्ये पुढच्या महिन्यात होणाऱ्या हज यात्रेवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. या यात्रेसाठी भारतासह इतर देशांमधून येणाऱ्या भाविकांना बंदी असणार आहे. हज यात्रेसाठी केवळ सौदी अरेबियातील नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे.