नवी दिल्ली : दोन दिवस रुग्णसंख्या 50 हजारांच्या आत आल्यानंतर आज पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढून 50 हजारांच्या वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 50,040 रुग्णांची भर पडली आहे तर 1258 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी दरात वाढ झाली असून तो 96.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात अजूनही 5,86,403 सक्रिय रुग्ण आहेत.
त्या आधी एक दिवस म्हणजे शनिवारी देशात 48,698 रुग्णांची भर पडली होती तर 1183 लोकांचा मृत्यू झाला होता. काल एका दिवसात 64 लाख 25 हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली असून आतापर्यंत एकूण 32 कोटी 17 लाखाहून जास्त कोरोनाच्या लसीचे डोस देण्यात आले आहेत.
देशातील आजची कोरोना स्थिती :
महाराष्ट्रातील स्थिती
राज्यात निर्बंध शिथिल केल्यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात आज 9,812 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,752 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सोमवारपासून राज्यात नवीन निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे.
राज्यात आता बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,81,551 इतकी झाली आहे. आज 179 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2 टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या 1,21,151 अॅक्टिव्ह केसेस आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. शनिवारी (26 जून) जिल्ह्यात 1551 नवीन बाधित आढळले आहेत तर 21 मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा हॉटस्पॉटच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या असून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे.