नवी दिल्ली : कोरोना लस निर्मिती करणारी स्वदेशी कंपनी भारत बायोटेकला मोठा धक्का बसला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने भारत बायोटेकसोबत झालेला लस खरेदीचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात सांगितलं आहे की, कंप्ट्रोलर जनरल कार्यालयाच्या शिफारशीवरुन कोवॅक्सिन खरेदी करण्याचा करार रद्द करण्यात आला आहे.
या करारामध्ये कोणतीही अनियमितता नाही, पण या कराराचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर तो रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचं ब्राझीलच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच या लसीच्या वापराला ब्राझीलच्या आरोग्य नियामक मंडळाकडूनही अद्याप मंजुरी मिळाली नाही.
फेब्रुवारी 2021 मध्ये ब्राझील सरकारने हैदराबद मधील लस निर्मिती कंपनी असलेल्या भारत बायोटेकशी दोन कोटी लसी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या कराराची एकूण रक्कम ही 2400 कोटी रुपये होती. त्यामुळे हा करार रद्द करण्याचा निर्णय हा भारत बायोटेकसाठी धक्कादायक असल्याचं सांगण्यात येतंय.
ब्राझीलचे राष्ट्रपती जेर बोलसेनारो यांनी कोवॅक्सिनची लस ही मोठ्या किंमतीला खरेदी केली असून या करारात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. जगभरातील लसी या कमी किंमतीत उपलब्ध असतानाही राष्ट्रपतींनी जास्त किंमतीच्या कोवॅक्सिनला प्राधान्य दिल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या प्रकरणी लुई मिरांडा यांनी संसदीय समितीकडे तक्रार केली होती.
फेब्रुवारीमध्ये केलेल्या या करारात ब्राझीलच्या प्रेसिसा मेडिकामेंटोस ही कंपनीही भागिदार आहे. या करारावरुन ब्राझीलचे राजकारण चांगलंच तापलं होतं.