उत्तर प्रदेशात पार पडलेल्या कुंभमेळ्यानंतर हजारोपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाच्या संकटात कुंभमेळ्याचा घाट का घातला असा सवाल विचारत अनेकांनी सरकारवर ताशेरे देखील ओढले होते. मात्र त्यातून काहीच धडा घेतलेला दिसत नाही. कारण ओडिशातील पुरीमध्ये आज भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेत कोरोना नियमांचा फज्जा उडाला आहे. पुरीमध्ये भगवान जगन्नाथ यांच्या रथ यात्रेला सुरुवात झाली असून, त्यासाठी किती गर्दी झाली आहे हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत. रथयात्रेसाठी पहाटे साडेचार वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आलेत. आरती आणि इतर धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर रथयात्रेला सुरुवात झाली. कोरोनामुळे यात्रेत भाविकांना सहभागी होण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र तरीही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत भाविक सहभागी झालेत. बहुतांश भाविकांच्या तोंडाला मास्कही नव्हता. यावेळी प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने केवळ बघ्याची भुमिका घेतली.