Zika Virus : देशात कोरोना प्रादुर्भावात आणखी एका व्हायरसनं चिंता वाढवली आहे. तो म्हणजे, झिका व्हायरस. केरळमध्ये एका गर्भवती महिलेल्या झिका व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. याच पार्श्वभूमीवर केरळमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच दिल्लीहून तत्काळ तज्ज्ञांचं एक विशेष पथक केरळसाठी रवाना झालं आहे. आतापर्यंत केरळमध्ये जवळपास 18 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती.
केरळ दौऱ्यावर असलेल्या दिल्ली एम्सच्या पथकानं झिका व्हायरसबाबत देशातील इतर राज्यांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर आता दिल्ली आणि मुंबईसह देशातील अनेक मोठ्या शहरांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळच्या शेजारील राज्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
डास चावल्यानं होणाऱ्या या आजाराचा पहिला रुग्ण केरळमध्ये गुरुवारी आढळून आला होता. परंतु, 48 तासांनी या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून आलं. या व्हायरसनं राज्यांसोबत केंद्र सरकारच्याही चिंतेत भर पडली आहे. एका गर्भवती महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं होतं. परंतु, शुक्रवारी नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीनं आणखी 13 नमुन्यांची चाचणी केली होती. त्यानंतर या 13 व्यक्तिंनाही झिका व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. 48 तासांत 14 रुग्णांना झिका व्हायरसची लागण झाली आहे.
काय आहे झिका व्हायरस? कसा होतो त्याचा प्रसार?
झिका व्हायरसचा प्रसार हा एडीस प्रकारचा डास चावल्याने होतो. एडीस प्रकारच्या डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप असे आजारही होतात. झिका व्हायरसचा प्रसार गर्भवती महिलेला झाल्यास तिच्या गर्भातही या व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपत्यामध्ये काहीतरी कमतरता निर्माण होते. या रोगाचा प्रसार साधारणपणे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय क्षेत्रात होतो.
एडीस प्रकारातील डास हा शक्यतो सकाळी आणि संध्याकाळी चावतो. सध्या जगातील 86 देशांमध्ये या प्रकाराचे डास आढळतात. 1947 साली आफ्रिकेत या रोगाचा शोध लागाला होता.
काय आहेत लक्षणं?
ताप येणं, त्वचेवर चट्टे पडणं, सांधेदुखी ही झिका व्हायरसची प्राथमिक लक्षणं आहेत. डोकेदुखी, अस्वस्थता असे लक्षणंही होऊ शकतात. ही लक्षण सामान्यपणे दोन ते सात दिवसांपर्यंत कायम राहतात. सध्या झिका व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही औषध वा लस उपलब्ध नाही.
डास चावण्यापासून संरक्षण करणे हाच सर्वात मोठा उपाय सध्या आपल्याकडे आहे. त्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे किंवा डास होऊ नयेत यासाठी उपाययोजना करणे या गोष्टीमुळे मोठा परिणाम होऊ शकतो.