देशात करोनाने हाहाकार केला होता. दरम्यान, देशात काहीसं दिलासादायक वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्ण संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३४ हजार ४५७ करोनाबाधित आढळले असून ३७५ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ६१ हजार ३४० वर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या १५१ दिवसांतील सर्वात कमी आहे.
भारतात सध्या करोना साथ चालू राहण्यास व नव्याने काही ठिकाणी उद्रेक होण्यास डेल्टा विषाणूच कारणीभूत आहे, त्यामुळे लशीची परिणामकारकता कमी दिसत असून विषाणूचा प्रसार वाढत आहे, असे इन्साकॉग या संस्थेने म्हटले
इन्साकॉग ही संस्था जनुकीय क्रमवारी लावणाऱ्या संस्थांची शीर्षस्थ संस्था आहे. लसीकरणामुळे गंभीर आजार व मृत्यूची शक्यता कमी झाली असली तरी प्रसार कमी झालेला नाही. त्यामुळे लसीकरण गरजेचे आहे असे इन्साकॉगने १६ ऑगस्टच्या त्यांच्या वार्तापत्रात म्हटले आहे.
भारतात करोना विषाणूंच्या जनुकीय क्रमवारीचे काम इन्साकॉग ही संस्था करीत असून भारतात डेल्टा विषाणूचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. एकूण ३०,२३० नमुन्यांचे विश्लेषण केले असता त्यातील २०,३२४ नमुने डेल्टा विषाणूचे निघाले आहेत. भारतात एवाय १, एवाय २ एवाय ३ या डेल्टा प्लस विषाणूचे प्रकार महाराष्ट्रात जुलैमध्ये दिसून आले आहेत. त्यांचे प्रमाण एक टक्का होते. डेल्टा प्रजातीतील विषाणू आता आले असले तरी देशात डेल्टा प्लसचे ६१ नमुने आतापर्यंत सापडले आहेत.