नवी दिल्ली - कोरोनानं जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाचं हे संकट टाळण्यासाठी सध्या लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकर लसीकरण करण्याचं आवाहन केलं जात आहे. अशातच आता कोरोना लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींच्या मृत्यूची शक्यता कमी असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे.
कोरोनानं जगभरात आपले हातपाय पसरले असताना आता अमेरिकेच्या आरोग्य विभागानं नवीन अहवाल जारी केला आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कन्ट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशनच्या वतीनं कोरोना लसीकरणाचे तीन अहवाल प्रकाशित केले आहेत. यामध्ये लसीकरण केल्यावर मृत्यूच्या प्रमाणात किती घट होते हे सांगण्यात आलं आहे.
या अहवालात म्हटलंय की, ज्या लोकांनी लसीकरण केलं नाही त्या तुलनेत ज्या लोकांनी लसीकरण पूर्ण केलं आहे ते जास्त सुरक्षित असून त्यांच्या मृत्यूची शक्यता ही 11 पटींनी कमी आहे.
दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट अजून संपली नसून तिसऱ्या लाटेच्या चिंतेनं हैराण करून सोडलं आहे. त्याच्यातच नवनवीन विषाणूंनी धुमाकूळ घालत तिसरी लाट येण्याची शक्यता बळकावली आहे.