नवी दिल्ली - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अशातच आता डेंग्यूचा हाहाकार पाहायला मिळत आहे. काही राज्यात डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये डेंग्यू आणि व्हायरल फिव्हरने थैमान घातले आहे. आरोग्य विभागानने याबाबत माहिती दिली आहे. तब्बल 12,000 लोकांना लागण झाली असून रुग्णालयात बेडच शिल्लक नसल्याने रुग्णांना बेडसाठी आता वणवण करावी लागत आहे. आतापर्यंत 88 चिमुकल्यांसह 114 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत चार जणांनी आपला जीव गमावला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डेंग्यूमुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.
सरकारी रुग्णालयात रुग्णांना बेड मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने लोक सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहे. मात्र आता रुग्णसंख्या वाढल्याने नव्या रुग्णांसाठी सध्या जागाच शिल्लक नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने एका मजुराने आपला पाच वर्षांचा चिमुकला गमावला आहे. खासगी रुग्णालयात मुलाच्या उपचारासाठी तीस हजार मागण्यात आले. पण मजुराकडे एवढे पैसे नसल्याने रुग्णालयाने मुलावर उपचार करण्यास नकार दिला. फिरोजाबादमध्ये डेंग्यूमुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
रुग्णालयात बेडच नाही, रुग्णांची वणवण
आरोग्य विभागाचे कर्मचारी हे घराघरात जाऊन लोकांची तपासणी करत आहेत, तसेच रुग्णालयात देखील मोठ्या संख्येने बेडची व्यवथा करण्यात येत आहे. डेंग्यू आणि व्हायरल फिव्हर हे सर्वात जास्त 15 वर्षांखालील मुलांना लक्ष्य करत आहे. त्यामुळेच लागण झालेल्यांमध्ये लहान मुलांची संख्या ही सर्वात जास्त आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना व्हायरससारखं डेंग्यूही आपलं रुप बदलत आहे. रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांच्या प्लेटलेट्समध्ये घट होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान जबलपूरमध्ये डेंग्यूचा नवा स्ट्रेन असल्याचं म्हटलं जात आहे. आतापर्यंत येथे जवळपास 410 रुग्ण आढळून आले आहेत. मध्य प्रदेशमध्ये सध्या डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.
ज्या रुग्णांचा डेंग्यू रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांच्यातही डेंग्यूची काही लक्षणं पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्स सातत्याने कमी होत आहे. यामुळे अनेक रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली आहे. अशातच जबलपूरमध्ये असे अनेक रुग्ण आढळून आले आहेत ज्यांच्यामध्ये फक्त व्हायरल फिव्हरची लक्षणं आढळून आली आहेत. मात्र तरी देखील त्यांच्या प्लेटलेट्समध्ये घट होत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सामान्यत: रक्तातील प्लेटलेट्स या एक लाख 50 ते चार लाखांपर्यंत असतात. मात्र आता डेंग्यूमुळे त्या वेगाने कमी होत आहेत.