काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. इंडियन एक्सप्रेशशी बोलताना खुर्शीद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या तुलनेत प्रियंका गांधी या उत्तम पर्याय असल्याचं म्हटलं आहे. “भविष्यामध्ये निवडणूक कोण जिंकणार हे निश्चित होईलच. मात्र प्रियंका गांधी या योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा उत्तम पर्याय आहेत आणि हेच वास्तव आहे,” असं खुर्शीद म्हणालेत.लखनऊमध्ये निवडणूक जाहिरनाम्यासंदर्भात विभागीय स्तरावरील बैठकीनंतर खुर्शीद यांनी आपलं मत नोंवदलं. “प्रियंका गांधी लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि लोकांना आश्वासन देत आहेत की उत्तर प्रदेश एक उत्तम आणि पारदर्शक सरकारची स्थापना केली जाणार आहे,” असं खुर्शीद म्हणालेत. यानंतर त्यांना प्रियंका गांधी योगी आदित्यनाथ यांना टक्कर देऊ शकतात का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “भविष्यामध्ये दिसून येईलच की कोण निवडणूक जिंकणार आहे. प्रियंका गांधींचा चेहरा हा त्यांच्यापेक्षा (योगींपेक्षा) फार उत्तम आहे आणि हेच सत्य आहे,” असं मत व्यक्त केलं.काँग्रेसच्या जाहिरनाम्यासंदर्भात निर्णय घेणाऱ्या समितीचे सदस्य असणाऱ्या खुर्शीद यांनी काँग्रेस दिवाळीनंतर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा जाहीनामा घोषित करणार असल्याचं म्हटलं आहे. “आम्ही विभागीय स्तरावर बैठकी सुरु केल्या आहेत. रविवारी अशीच एक बैठक लखनऊमध्ये झाली. करोना कालावधीमध्ये आम्ही अनेकांसोबत तज्ज्ञांसोबत ऑनलाइन माध्यमातून बैठकी घेतल्यात. परिस्थिती सध्या सुधारलीय तर आम्ही प्रत्यक्षात लोकांच्या बैठकी घेत आहोत. त्यांच्या अडचणी ऐकून त्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय. जाहीरनामा हे आमचं धोरण आहे. जेव्हा लोक हा जाहीरनामा पाहतील तेव्हा त्यांना हे जाहीरनामा आपल्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करतोय असं वाटलं पाहिजे,” असं खुर्शीद म्हणाले.खुर्शीद यांनी काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात येतील असंही सांगितलं. “भाजपा सरकारने अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या खोट्या तक्रारी मागे घेण्याचा आम्ही प्रयत्न करु जेथे कायद्याचा दुरुपयोग करण्यात आलाय. मग हे गुन्हे चकमकीचे असो किंवा बेकायदेशीरपद्धतीने घरं पाडण्याचे असो किंवा अटकेसंदर्भातील असो आम्ही न्याय देण्यासाठी प्रयत्न करु,” असं खुर्शीद म्हणाले.