करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीच्या वातावरणातही भारतात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्या २४ तासांत देशात एकूण १० हजार १२६ नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या २६६ दिवसांतील ही सर्वात कमी दैनंदिन प्रकरणे आहेत. त्याच वेळी, भारतात सक्रिय रुग्णांची संख्या १,४०,६३८ वर आली आहे, जी गेल्या २६३ दिवसांतील सर्वात कमी आहे. त्याच वेळी, गेल्या २४ तासात ३३२ करोना रुग्णांना आपला प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा ४,६१,३८९ वर पोहोचला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सलग ३२ दिवस करोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या २० हजारांपेक्षा कमी आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या देखील १,४०,६३८ वर आली आहे, जी एकूण रुग्णांच्या ०.४१ टक्के आहे. हा दर मार्च २०२० नंतरचा सर्वात कमी आहे. गेल्या २४ तासात सक्रिय रुग्णांच्या संख्येत २,१८८ ने घट झाली आहे. रूग्णांचा राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर ९८.२५ टक्के आहे, जो मार्च २०२० पासून सर्वाधिक आहे.
गेल्या ४६ दिवसांपासून, साप्ताहिक सकारात्मकता दर दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि तो १.२५ टक्के आहे. तर दैनिक सकारात्मकता दर ०.९३ टक्के नोंदवला गेला आहे. दैनंदिन सकारात्मकता दर गेल्या ३६ दिवसांपासून दोन टक्क्यांच्या खाली आणि सलग ७१व्या दिवशी तीन टक्क्यांच्या खाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत एकूण १०,८५,८४८ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यासह, एकूण चाचण्यांची संख्या ६१,७२,२३,९३१ झाली आहे. गेल्या २४ तासांत करोना लसीचे ५९,०८,४४० डोस देण्यात आले आहेत. ताज्या अहवालानुसार, आज सकाळी सात वाजेपर्यंत देशात लसीचे १,०९,०८,१६,३५६ डोस देण्यात आले आहेत.