Coronavirus Today : देशातील रुग्णसंख्येत पुन्हा एकदा किंचित वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 13 हजार 91 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 340 जणांचा मृत्यू झाला आहे. सलग 34 दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही 20 हजारांखाली तर सलग 137 दिवसांपासून 50 हजारांखाली नोंदल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या एक लाख 38 हजार 556 इतकी झाली आहे. गेल्या 266 दिवासांतील ही सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या आहे.
4,62,189 जणांचा मृत्यू –केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन कोटी 44 लाक एक हजार 670 इतकी झाली आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्याही घटली आहे. देशातील उपचाराधीन रुग्णसंख्या एक लाख 38 हजार 556 इतकी झाली आहे. मागील 24 तासांत 340 जणांचा मृत्यू झालाय. देशातील एकूण मृताची संख्या वाढून 4,62,189 झाली आहे.
3,38,00,925 रुग्णांची कोरोनावर मात –मागील 34 दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही 20 हजारांखाली तर सलग 137 दिवसांपासून 50 हजारांखाली नोंदवली गेली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 0.41 टक्के इतकी आहे. मार्च 2020 नंतर हा दर सर्वात कमी आहे. मागील 24 तासांत देशात 13,878 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 3,38,00,925 इतकी झाली आहे. देशाचा मृत्यूदर 1.34 टक्के इतका आहे.
110 कोटी डोस –कोरोनाविरोधात देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंक 110 कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. मागील 24 तासांत देशात 57 लाख 54 हजार 817 जणांना कोरोनाप्रतिबंधक लस देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत 110 कोटी 23 लाख 34 हजार 225 लसीचे डोस देण्यात आले आहेत.
केरळनं देशाची चिंता वाढवली -केरळ राज्यानं देशाची चिंता वाढवली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी जवळपास 60 टक्के रुग्ण एकट्या केरळ राज्यातील आहेत. मागील 24 तासांत केरळमध्ये सात हजार 540 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 48 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून केरळमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळमधील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50,34,858 इतकी झाली आहे. तर मृताची संख्या 34,621 इतकी झाली आहे.
महाराष्ट्रातही रुग्णाच्या संख्येत वाढ – महाराष्ट्रातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ पाहायला मिळाली. राज्यात मागील 24 तासांत 1094 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1976 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 63 हजार 932 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के आहे. राज्यात 24 तासांत 17 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 12 हजार 410 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,29,714 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 870 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 35 , 22, 546 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.