करोनाचा प्रभाव कमी होण्याची चिन्हं दिसत असतानाच आता एका नव्या व्हेरिएंटने आपली दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे. या व्हेरिएंट करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक वेगाने पसरणारा असून तो अधिक घातकही आहे. नुकतंच B.1.1.529 या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने ओमीक्रोन असं नाव दिलं आहे. या विषाणूशी लढण्यात लस कितपत प्रभावी ठरेल, कोणती लस प्रभावी असेल, ती लस कधी येणार असे अनेक प्रश्न आता जनतेच्या मनात आहेत. या प्रश्नांची उत्तरं लस उत्पादकही शोधण्याच्या प्रयत्नात आहे.
अमेरिकेतल्या मॉडेर्ना लसउत्पादक कंपनीने शुक्रवारी हे स्पष्ट केलं की ते या नव्या ओमीक्रोन व्हेरिएंटविरोधात लढण्यासाठी बुस्टर शॉटची निर्मिती करत आहेत. कंपनीने या नव्या व्हेरिएंटशी लढण्यासाठी तीन प्रकारची रणनीती आखली आहे. त्यापैकीच एक म्हणजे सध्या असलेल्याच लसीची उच्च मात्रा देणे, अशी माहिती मॉडेर्नाने दिली. मॉडेर्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टिफन बॅन्सेल म्हणाले की ओमीक्रोनचे वेगाने होणारे म्युटेशन्स चिंताजनक आहेत. या व्हेरिएंटविरोधात लढण्यासाठी आम्ही शक्य तितक्या वेगाने हालचाली करत आहोत.
फायझर आणि बायोएनटेक या कंपन्यांनी सांगितलं की ते ओमीक्रोनबद्दल संशोधन करत आहेत आणि त्यांची लस लवकरात लवकर बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. या व्हेरिएंटसंदर्भातल्या चाचण्यांमधून येत्या दोन आठवड्यात आणखी माहिती मिळण्याची अपेक्षा या कंपन्यांना आहे.
जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने शुक्रवारी सांगितलं की ते ओमीक्रोनसंदर्भात त्यांच्या लसीची चाचणी करत आहेत. नोवोवॅक्सनेही जाहीर केलं की या व्हेरिएंटपासून सुरक्षा देणाऱ्या लसनिर्मितीसाठीचे त्यांचे प्रयत्न सुरु झालेले आहेत.