भारतात करोना संसर्गाची रोजची प्रकरणे कमी होत असली तरी संसर्गामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यासोबतच करोनाच्या नवीन प्रकाराने संपूर्ण जगात भय पसरले आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे आठ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर ६२१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान ९ हजारांहून अधिक लोक निरोगी देखील झाले आहेत. यासोबतच सक्रिय प्रकरणांमध्येही सातत्याने घट होत आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाचे १ लाख ०५ हजार ६९१ सक्रिय रुग्ण आहेत. हा आकडा ५४३ दिवसांनंतरचा सर्वात कमी आहे. तर आतापर्यंत ३ कोटी ३९ लाख ९८ हजार २७८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४१ लाख ७५ हजार १७५ रुग्ण आढळले आहेत, तर ४ लाख ६८ हजार ५५४ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
काही राज्यांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. कर्नाटक, केरळ, तामिळनाडूसह इतर राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढले आहेत. संसर्गामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ओमिक्रॉन या करोनाच्या नवीन प्रकाराच्या आगमनाने भारतासह जगाची चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळणाऱ्या या प्रकारांनी अनेक देशांमध्ये कहर केला आहे. या धोकादायक प्रकारामुळे अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.
आयसीएमआरने सध्या घाबरण्याची कोणतीही गरज नसून काळजी घेण्यासोबतच लवकरात लवकर करोनाचा दुसरा डोस घ्यावा असं आवाहन केलं आहे. “‘ओमिक्रॉन’मध्ये होत असलेले रचनात्मक बदल काळजी वाढवण्याची शक्यता कमी आहे. हा नवा विषाणू घातक किंवा अनेक आजार निर्माण करणारा ठरेल असं गरजेचं नाही. अशी कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नसून आपल्याला वाट पहावी लागेल,” असं आयसीएमआरचे डॉक्टर समीरन पांडा यांनी सांगितलं आहे.