दक्षिण आफ्रिकेमधून जगभरामध्ये प्रादुर्भाव झालेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटबद्दल भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. एकीकडे या विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने त्यासंदर्भातील चिंता व्यक्त केली जात असतानाच आता जागतिक आरोग्य संघटनेनं लहान मुलांना या नवीन विषाणूपासून असणाऱ्या धोक्यासंदर्भातील महत्वाची माहिती दिलीय. जागतिक आरोग्य संघटेच्या युरोपमधील कार्यालयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार पाच ते १४ वयोगटातील मुलांमध्ये करोनाचा संसर्ग वेगाने होताना दिसतोय.
जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपमधील रिजनल डायरेक्टर डॉ. हँस क्लूज यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरणामुळे यंदा फार मोठा दिलासा मिळाल्याचं म्हटलं आहे. मागील वेळेस करोनाची लाट आलेली त्यावेळेस झालेल्या मृत्यूंच्या संख्येपेक्षा यंदा मृतांची संख्या फार कमी आहे. मात्र त्याचवेळी ५३ देशांमध्ये करोनाबाधितांची आणि करोना मृतांची संख्या ही दुप्पटीने वाढलीय याकडेही क्लूज यांनी लक्ष वेधलं आहे.
डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग अद्यापही अनेक देशांमध्ये होताना दिसतोय. त्यातच आता २१ देशांमध्ये ओमायक्रॉनचे ४३२ रुग्ण आढळून आलेत अशी माहितीही क्लूज यांनी दिलीय. “युरोप आणि मध्य आशियामध्ये डेल्टा व्हेरिएंट आजही डेल्टा व्हेरिएंटचा फार प्रभाव दिसतोय. या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि मृत्यू रोखण्यासाठी लस फायद्याची आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे,” असं क्लूज म्हणाले. ओमायक्रॉन किती गंभीर आहे हे येणाऱ्या कालावधीमध्ये समोर येईल असंही ते म्हणालेत.
क्लूज यांनी लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढल्याबद्दलही चिंता व्यक्त केलीय. युरोपमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण दोन ते तीन पटींनी वाढलं आहे, असं ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी वयस्कर व्यक्ती, आरोग्य कर्मचारी आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांपेक्षा लहान मुलांना गंभीर प्रकारच्या संसर्गाची शक्यता कमी असते असंही क्लूज यांनी स्पष्ट केलंय.
“शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर मुलं आई-वडील किंवा आजी-आजोबांसोबत राहण्यासाठी जातात. यामुळे लहान मुलांच्या माध्यमातून प्रौढांमध्ये करोना संसर्ग होण्याची शक्यता वाढते. अशा माध्यमातून लसीकरण न झालेल्या व्यक्तींना संसर्ग झाल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसण्यापासून ते मृत्यू होण्याची शक्यता १० टक्क्यांनी वाढते,” असं क्लूज म्हणाले. लहान मुलांच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचं क्लूज म्हणालेत. पाच ते १४ वयोगटातील मुलांमध्ये करोना संसर्ग फार वेगाने होत असल्याचंही क्लूज म्हणाले. अनेक देशांमध्ये या वयोगटातील रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आठवड्याच्या अहवालानुसार सध्या युरोप हे करोना संर्सगाचं केंद्र आहे. जगभरामध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी ६१ टक्के मृत्यू युरोपातील असून संसर्गची एकूण ७० टक्के प्रकरणं ही युरोपातील असल्याचं या अहवालातून स्पष्ट झालंय.
करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्पेनमधील आरोग्य मंत्रालयाने ५ ते ११ वर्षांच्या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यास परवानगी दिलीय. युरोपातील अनेक देशांमध्ये लहान मुलांचे लसीकरण यापूर्वीच सुरु झाले आहे. स्पेनच्या आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १३ डिसेंबरपर्यंत ३२ लाख डोस उपलब्ध होतील. त्यानंतर १५ डिसेंबरपासून मुलांचे लसीकरण सुरु केलं जाणार आहे.