देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली असली तरी करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट कायम आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे ७ हजार ९९२ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान देशात ५५९ दिवसांतील सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. देशात सध्या करोनाचे ९३ हजार २७७ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. तर रिकव्हरी रेटमध्ये देखील वाढ झाली असून हा दर सध्या ९८.३६ टक्क्यांवर आहे. मार्च २०२० नंतर हा रिकव्हरी रेट सर्वाधिक आहे.
देशात गेल्या २४ तासांत ९,२६५ जणांनी करोनावर मात केली असून, यासोबतच करोनातून बरे झालेल्यांची संख्या ३,४१,१४,३३१ वर पोहोचली आहे. देशातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृतांची संख्या मात्र चिंता वाढवणारी आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, या नवीन मृत्यूनंतर देशातील एकूण मृतांची संख्या ४,७५,१२८ झाली आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत १३१.९९ कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.