गुरुग्राममध्ये खुल्या जागेवर नमाज पठण केलेलं खपवून घेणार नाही, असा इशारा हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिला आहे. गुरुग्रामच्या सेक्टर ३७ मधील मोकळ्या जागेत शुक्रवारच्या नमाज अदा करण्यावर अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर मनोहर लाल खट्टर यांचे हे वक्तव्य आले आहे. दरम्यान “नमाज पठण करण्यासाठी काही खुल्या जागा राखीव ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय मागे घेण्यात आला असून राज्य सरकार या समस्येवर लवकरच तोडगा काढेल,” असं खट्टर म्हणाले.
एका सरकारी कार्यक्रमाला आलेले खट्टर म्हणाले की, “त्यांना किंवा सरकारला यापासून कोणाचीही अडचण नाही. प्रत्येकाला आपल्या देवाची पूजा करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे, मात्र प्रत्येकाने मर्यादेत राहून हे कार्य केले पाहिजे. मुस्लिमांनी मशिदीत जाऊन नमाज अदा करावी, दर आठवड्याला मोकळ्या मैदानात एकत्र येणे चुकीचे आहे. सरकार हे होऊ देणार नाही.”
“यापूर्वी प्रशासनाने काही ठिकाणी नमाज पठणासाठी परवानगी दिली होती, मात्र नंतर ती मागे घेण्यात आली. अशाप्रकारे सर्वांनाच मनमानी करू दिली, तर राज्यात अराजकतेची परिस्थिती निर्माण होईल. सरकारला मुस्लिमांची कोणतीही अडचण नाही. ते त्यांच्या मनाप्रमाणे धार्मिक कार्य करू शकतात पण खुल्या जागेत नाही, असं खट्टर म्हणाले.”
शुक्रवारी नेमकं काय घडलं…
दरम्यान, नेहमीप्रमाणे यावेळी देखील शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी होणारा गदारोळ सुरूच होता. सेक्टर ३७ पोलीस ठाण्यासमोरील परिसरात मुस्लिम समाजाचे लोक येऊ लागताच हिंदू संघटनांच्या लोकांनी नमाजासाठी निश्चित केलेली जागा ताब्यात घेतली. त्यांनी बिपीन रावत यांच्या स्मरणार्थ तेथे सभेचे आयोजनही केले होते. तसेच पोलिसांच्या उपस्थितीत त्यांनी रिकाम्या जागेवर ट्रक उभे केले. पोलिसांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम देण्यात आले होते. परंतु पोलिसांच्या उपस्थितीत तिथे ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या.