राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी गुरुवारी लग्नगाठ बांधली. तेजस्वी यांनी त्यांची मैत्रीण रचेलसोबत लग्न केलंय. तेजस्वी यांच्या लग्नामुळे यादव कुटुंबीय आनंदात असले तरी त्यांचे मामा मात्र नाराज आहेत. इतके की त्यांनी तेजस्वीला कलंकही म्हटले आहे. तेजस्वी यांचे मामा साधू यादव यांना लग्नाबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी तेजस्वी बिहारमध्ये आल्यास बूट आणि चप्पलांनी त्यांचं स्वागत करू, असा इशारा दिलाय.
“तेजस्वी यादव यांनी ख्रिश्चन मुलीशी लग्न का केले? असा सवाल साधू यादव यांनी केला. तेजस्वीने स्वतःच्या धर्मात लग्न का केले नाही? त्याने जातीतल्या मुलीशी लग्न का केलं नाही? यासाठी यादवांमध्ये प्रचंड संताप आहे,” असा दावा त्यांनी केला आहे. “लालूंनी आपल्या मुलींच्या लग्नात जात-धर्म सर्वकाही पाहून लग्न केलं. मग तेजस्वी यादव यांच्या लग्नात त्यांनी एवढी मोठी चूक कशी केली,” असा सवाल साधू यादव यांनी केलाय.
यादव समाज लालू आणि त्यांच्या कुटुंबाला आपला नेता मानत होता, पण तेजस्वी यांनी यादव यांच्या स्वप्नांवर पाणी सोडले, असे साधू यादव म्हणाले. “आता तेजस्वी यांनी मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न सोडून द्यावे, कारण ते यादव नव्हे तर ख्रिश्चन झाले आहेत. यादवांमुळे लालू यादव वर्षानुवर्षे सत्तेत राहिले, मात्र आता हाच यादव समाज तेजस्वी यादव यांना विरोध करणार असल्याचे साधू यादव म्हणाले. यादव समाजात मुलीची कमतरता होती का, ज्यामुळे तेजस्वीने ख्रिश्चन धर्माच्या मुलीशी लग्न केले. ते म्हणाले की, हे लोक बिहारच्या जनतेला मतं मागतात, पण लग्नासाठी दुसऱ्या राज्यातील दुसऱ्या धर्मातील मुली निवडतात. यासाठी बिहारची लोकं लालूंना उत्तर देतील,” असं साधू यादव म्हणाले.