कृषी कायद्यांविरुद्ध गेले वर्षभर सुरू असलेले आंदोलन संपवून शेतकऱ्यांनी शनिवारी दिल्लीच्या सीमांवरून आपल्या घराकडील प्रवास गाणी गात, नाचत आणि आपल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवरून आनंद व्यक्त करत सुरू केला. या परतीच्या प्रवासात लगतच्या राज्यांत त्यांचे मिठाई देऊन व हार घालून स्वागत करण्यात आले. पंजाब आणि हरियाणातील वेगवेगळ्या ठिकाणी मिठाई आणि हार घालून शेतकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर विमानाने शेतकऱ्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
गेले वर्षभर सीमेवर ठाण मांडून बसलेले शेतकरी विजयी झाल्यानंतर घरी परतताना भावूक झालेले दिसले. आंदोलनकर्ते सुखबीर सिंग म्हणाले, “मी घरातून निघताना माझ्या आईला सांगितले होते की जेव्हा सरकार तिन्ही कृषी कायदे परत घेईल, तेव्हाच मी परत येईन. आता मी परत जाऊन माझ्या आईला अभिमानाने सांगू शकते की मी माझे वचन पूर्ण केले आहे. मी एक शीख आहे आणि आम्ही शिख तेव्हाच विश्रांती घेतो जेव्हा आम्ही आमचे कार्य आणि वचन पूर्ण करतो.”
तर, ५० वर्षीय महिला आंदोलक हरसिमरत म्हणाल्या, की त्यांना अजूनही विश्वास बसत नाही की आंदोलनातून त्यांनी त्यांचे ध्येय साध्य केले आहे. गाझीपूर सीमेवरील लंगरची जबाबदारी गेल्या नऊ महिन्यांपासून त्या सांभाळत होत्या. त्या गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथून फक्त काही दिवस आंदोलनस्थळी राहण्यासाठी आल्या होत्या. परंतु एका आठवड्याच्या आंदोलनानंतर त्यांनी इथे थांबण्याचा निर्णय घेतला.
“एका आठवड्याच्या आत, मी शेतकऱ्यांची एकमेकांशी असलेली मैत्री पाहिली आणि मला विरोध समजला. आमचा कायद्यांना विरोध हा काही नावापुरता नव्हता, हे आमचे अस्तित्व वाचवण्यासाठी केलेले आंदोलन होते. माझे बांधव अत्यंत कठीण परिस्थितीत महामार्गावर आंदोलन करत होते, हे पाहून मी घरी शांततेत बसू शकत नव्हते. त्यामुळे मी या आंदोलनात सहभागी झाले. आज मात्र मी समाधानाने घरी परतत आहे,” असं हरसिमरत सांगतात.