पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्याआधीच अफवांचा बाजार उठला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू हरभजन सिंग भाजपमध्ये प्रवेश करू शकतो, अशी एक बातमी समोर येत होती. मात्र, हरभजनने या वृत्तांचे खंडन करत त्याला ‘फेक न्यूज’ म्हटले आहे.
खरे तर, एका मीडिया आउटलेटने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला होता, की पंजाब निवडणुकीपूर्वी हरभजन सिंग आणि युवराज सिंग भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. यावर प्रतिक्रिया देताना हरभजनने एक ट्वीट करत ही बातमी बनावट असल्याचे सांगितले. मात्र, युवराजच्या बाजूने अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.
हरभजन सिंग लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. हरभजन इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) भाग राहणार आहे. आयपीएल २०२२च्या एका प्रमुख फ्रेंचायझीच्या सपोर्ट स्टाफचा सदस्य म्हणून हरभजन सिंग दिसणार आहे. पीटीआयच्या बातमीत हा दावा करण्यात आला आहे.
हरभजन सिंगने भारतासाठी १०३ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ४१७ विकेट घेतल्या. वनडेमध्ये त्याने २३६ सामन्यात २६९ विकेट घेतल्या आहेत. टी-20 मध्ये त्याने भारतासाठी २८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २५ विकेट्स घेतल्या आहेत.