जगभरात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. या नवीन व्हेरिएंटमुळे अनेक देशांमध्ये अचानक रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जगभरातल्या तब्बल ५९ देशांमध्ये हा व्हेरिएंट पसरला आहे. भारतातही ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असून सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यातच आता देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट तयार होतंय. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) दक्षिण पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, “नवीन व्हेरिएंट आलाय याचा अर्थ असा नाही की परिस्थिती आणखी वाईट होईल, परंतु परिस्थिती नक्कीच अधिक अनिश्चित असेल.”
एनडीटीव्हीशी बोलताना डॉ. पूनम म्हणाल्या, “महामारीचा धोका अजूनही कायम आहे. करोनाचे नवीन व्हेरिएंट आणि जगाच्या इतर भागांमध्ये वाढत असलेली करोनाबाधितांची संख्या यामुळे जागतिक स्तरावर करोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे विशेषतः दक्षिण आशियामध्ये निष्काळजीपणा करण्यात येऊ नये. या भागात करोना रुग्णांवर लक्ष ठेवणे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करणे आणि करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासह लसीकरण वाढवणे आवश्यक आहे.”
डॉ. पूनम म्हणाल्या, “ओमायक्रॉनचा जागतिक प्रसार आणि मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तनांसह काही वैशिष्ट्यांचा लक्षणीय परिणाम होऊ शकतो. त्याचा नेमका काय परिणाम होईल हे जाणून घेणे थोडे कठीण आहे. त्यामुळे WHO ने देशांना अधिकाधिक डेटा सबमिट करण्यास सांगितले आहे. डेटाचे विश्लेषण करण्यासाठी हजारो तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. ओमायक्रॉनच्या संसर्गाची क्षमता, तीव्रता, पुन्हा संसर्ग होण्याचा धोका, इतर घटकांसह मूल्यांकन करण्यासाठी अभ्यास चालू आहेत.”
“दक्षिण आफ्रिकेतून येणारा डेटा ओमिक्रॉनमधून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका दर्शवत आहे. परंतु आम्हाला पुढील निष्कर्ष काढण्यासाठी अधिक माहितीची आवश्यकता आहे. घाईत काहीही सांगणे योग्य ठरनार नाही,” असं डॉ. पूनम म्हणाल्या.