पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसनेही गोव्यात विधानसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनाही मैदानात उतरली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यांनी गोवा विधानसभेच्या ४० जागांपैकी २२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे याआधी जाहीर केले आहे. तसेच गोव्यामध्ये शिवसेनेचं सरकार आलं तर शिवसेना महाराष्ट्रामधील प्रशासनाप्रमाणे गोव्यामध्येही चांगली कामगिरी करणारं सरकार देईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला होता.
त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणार का या प्रश्नावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोव्यात पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत.
“यावर बोलण्यासाठी थोडा वेळ लागेल. सर्वांसोबत चर्चा सुरु आहेत. इतक्या घाईघाईने मी काही सांगू शकत नाही. सर्वच पक्षांबरोबर नेहमीच चर्चा सुरु आहे. पण समोरच्या पक्षाकडून प्रस्ताव आला तर त्यावर पक्ष विस्ताराने चर्चा करेल. ज्या राज्यात आम्हाला एकत्र यायचे आहे तिथल्या लोकांसोबतस चर्चा केली जाते. आतापर्यंत ही चर्चा झालेली नाही,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान, याआधी बोलतान “शिवसेना २२ जागांवर निवडणूक लढणार आहे. आम्ही या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. आम्हाला कोणत्याही युतीची गरज नाही. आमची पक्षबांधणी उत्तम आहे. तर कोलकात्यामधील तृणमूल गोव्यात निवडणूक लढवू शकते तर महाराष्ट्र गोव्याच्या बाजूलाच आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये कशी कामगिरी केलीय हे तुम्ही पाहू शकता,” असं राऊत यांनी म्हटले होते. “महाराष्ट्रामध्ये शिवसेना ज्या पद्धतीने काम करत आहे आम्ही त्याच पद्धतीने गोव्यात काम करु. शिवसेना आणि गोव्याचं भावनिक नातं आहे,” असेही राऊत म्हणाले.
तसेच काही दिवसांपूर्वी प्रियंका गांधी यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रया देताना मोठं विधान केले होते. प्रियंका गांधींसोबत झालेल्या बैठीकाबाबत बोलताना संजय राऊत यांनी, “ही बैठक सकारात्मक होती. आम्ही उत्तर प्रदेश आणि गोव्यात एकत्र काम करण्याचा विचार करत आहोत” अशी माध्यमांना माहिती दिली होती