भाजपा आणि विश्व हिंदू परिषदेचं गाईंवर असलेलं प्रेम सर्वांनाच माहित आहे. गाईचे महत्व सांगत गाईला राष्ट्रीय पशू घोषित करण्यात यावं, अशी मागणीही अनेकदा करण्यात आली आहे. गाईमध्ये ३३ कोटी देवता असतात, तसेच गाईपासून मिळणाऱ्या पदार्थांचा वापर करून पंचामृत तयार करण्यात येतं, त्यामुळे गाईला राष्ट्रीय पशू घोषित केलं जावं, अशी मागणी सातत्याने केली जाते. अनेक राज्यांमध्ये तर गाईंच्या रक्षणासाठी गोहत्या कायदा देखील आहे. त्याच गाईच्या रक्षणासाठी आता लोकांनी तलवारी हातात घ्याव्यात, असं विधान विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वती यांनी केलंय.
विहिंपने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना साध्वी सरस्वती म्हणाल्या की, “फोनवर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी लोकांनी गायींच्या संरक्षणासाठी तलवारी आणि शस्त्रे खरेदी केली पाहिजेत.” साध्वी म्हणाल्या की, “जर लोकांना लाखो रुपयांचे फोन विकत घेणे परवडत असेल तर ते आपल्या गायींच्या रक्षणासाठी नक्कीच शस्त्रे खरेदी करू शकतात आणि घरात ठेवू शकतात. शस्त्रांच्या खरेदीमुळे लोक त्यांच्या देवी मातेचे (गाईचे) गोहत्येपासून संरक्षण करतील, याची खात्री होईल. आपला जन्म गोठ्यात झाला असून गोहत्या रोखणे हे माझे कर्तव्य आहे,” असं उडुपी जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना साध्वी सरस्वती म्हणाल्या.
“ज्या दिवसापासून माझा जन्म झाला तेव्हापासून माझ्याकडे दोन संकल्प होते. एक म्हणजे प्रभू रामाचे मंदिर बांधणे आणि दुसरे म्हणजे भारतात गोहत्या बंद करणे,” साध्वी असं विधान साध्वी सरस्वतींनी केलंय.