एकीकडे राज्यात विधानपरिषद निवडणुकीत भाजपानं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभूत करत आगामी निवडणुकांसाठी शड्डू ठोकले असताना दुसरीकडे दिल्लीत सत्ताधारी भाजपाविरोधात विरोधक एकवटले आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या १२ खासदारांना पूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्याची कारवाई लोकसभा अध्यक्षांनी केली होती. त्याविरोधात गेल्या १० ते १२ दिवसांपासून विरोधी पक्षांकडून सरकारचा निषेध करत आंदोलन केलं जात असताना आज राहुल गांधींसह सर्वच विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी संसदेबाहेर जमत मोदी सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.
खासदारांचं निलंबन हे शेतकरी आंदोलनासाठी मोठं बलिदान असल्याचं यावेळी संजय राऊत म्हणाले. “२ आठवड्यांपासून हा संघर्ष सुरू आहे. हे फक्त १२ खासदारांचं निलंबन नाही. मी मानतो की शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी आमच्या खासदारांचं हे सर्वात मोठं बलिदान आहे. सरकार ऐकायला तयार नाही. आज जेव्हा आम्ही सकाळपासून सदनात आंदोलन सुरू केलं, तेव्हा आमची मागणी होती लोकशाही वाचवा आणि आम्हाला न्याय हवा. पण लोकशाही आणि न्याय हे शब्द सरकारला ऐकायचे नाहीत”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी आज सभागृहात घडलेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “आम्ही चेअरमन साहेबांकडे मागणी केली की आम्हालाही निलंबित करा. तर त्यांनी सरकारकडे बघून सांगितलं की त्यांना सांगा तुम्हाला निलंबित करायला. याचा अर्थ अध्यक्षांचे अधिकार सरकारकडे आहेत. सरकारला वाटलं तर निलंबित करतील, सरकारला वाटलं तर निलंबन मागे घेतील. आजपर्यंतच्या इतिहासात लोकशाहीमध्ये असा दिवस आम्हाला पाहायला मिळाला नव्हता”, असं ते म्हणाले.
“लोकशाही आणि न्यायाची मागणी करणाऱ्या आमच्या १२ खासदारांना निलंबित केलं. आम्ही १२ दिवसांपासून महात्मा गांधींच्या चरणांशी बसलो होतो. आज दुसऱ्या गांधींसोबत आम्ही इथपर्यंत आलो आहोत. आता आम्ही पाहू, किसमे कितना है दम. आम्ही लढू आणि लढत राहू. आम्ही झुकणार नाही आणि घाबरणार नाही हाच संदेश मी आज देशाला देऊ इच्छितो. आमचा आवाज, शेतकऱ्यांचा आवाज, लोकशाहीचा आवाज पूर्ण देशापर्यंत पोहोचायला हवा. सरकार जोपर्यंत आमचं म्हणणं मान्य करत नाही, तोपर्यंत आमचा आवाज घुमत राहील”, असं राऊत यावेळी म्हणाले.