तिन्ही कृषी कायदे रद्द झाल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर बसलेले शेतकरी घरी परतू लागले आहेत. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी १५ डिसेंबरपर्यंत गाझीपूर सीमा रिकामी करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार थोड्या प्रमाणात राहिलेले शेतकरी देखील घराच्या वाटेने निघाले आहेत. तर, दुसरीकडे सिंघू सीमेवरूनही शेतकऱ्यांची घरवापसी सुरू आहे. आज दिल्लीच्या सीमा खाली करून निघताना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले.
“आमच्यासोबत असलेल्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. लंगर चालवणार्या लोकांचे, आमच्यासाठी जीवनावश्यक वस्तू आणणार्या ग्रामस्थांचेही मी आभार मानतो. शेतीविषयक तिन्ही कायदे मागे घेतल्यानंतर केंद्राशी चर्चा सुरू आहे. आम्ही आमचे आंदोलन स्थगित केले आहे, मागे घेतलेले नाही,” असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले.
केंद्र सरकारने आणलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर आंदोलन केलं. अनेक मोर्चे काढले, शेकडो शेतकऱ्यांनी प्राण गमावले. मात्र, जोपर्यंत केंद्राने कायदे मागे घेतले नाही, तोपर्यंत आंदोलन कायम ठेवलं. १९ नोव्हेंबरला केंद्राने कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतरही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवलं होतं. त्यानंतर ९ डिसेंबरला शेतकऱ्यांनी आंदोलन संपवत असल्याची घोषणा केली. दरम्यान आज दिल्ली आणि उत्तर प्रदेशची कौशांबी बॉर्डर सोडताना शेतकऱ्यांनी गाणी वाजवत, नाचत-गात हातात तिरंगा घेऊन आनंद साजरा केला.
आंदोलन संपवलं असलं तरी केंद्रासोबत चर्चा सुरू राहणार असून १५ जानेवारीला पुन्हा शेतकरी नेत्यांची आढावा बैठक होणार आहे, अशी माहिती शेतकरी नेते बलवीर सिंह राजेवाल यांनी दिली होती. त्यानुसार शेतकरी नेते १५ जानेवारीला पुन्हा एकदा एकत्र येतील.