गेल्या काही महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून येत आहे. गेला महिनाभर या किंमती काहीशा स्थिर राहिल्या असल्या, तरी तोपर्यंत पेट्रोलचे दर प्रतिलिटर १००च्याही वर गेले असून डिझेलनंही त्या दिशेनं दमदार सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर कमी करण्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये टोलवाटोलवी सुरू असताना आता केंद्रानं इंधनावरील करांमधून गेल्या तीन वर्षांत केलेल्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीच ही आकडेवारी दिली आहे.
निर्मला सीतारमण यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी राज्यसभेत बोलताना इंधनावरील करांच्या माध्यमातून केंद्रानं गेल्या तीन वर्षांत किती कमाई केली, याची माहिती दिली. यानुसार, गेल्या तीन वर्षांत अर्थात २०१८ पासून इंधनावरील करांच्या माध्यमातून केंद्रानं तब्बल ८ लाख कोटींची कमाई केली आहे. यापैकी ३.७१ लाख कोटी रुपये तर २०२०-२१ या एकाच वर्षात केंद्राच्या तिजोरीत जमा झाल्याचं निर्मला सीतारमण यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे.
निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार ५ ऑक्टोबर रोजी पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी १८.४८ रुपये तर डिझेलवरील एक्साईज ड्युटी १५.३३ रुपये प्रतिलिटर इतकी होती. ती ४ नोव्हेंबर २०२१च्या आकडेवारीनुसार वाढून थेट २७.९० रुपये आणि २१.८० रुपये प्रतिलिटर इतकी झाली आहे.
या कालावधीमध्ये ६ जुलै २०१९च्या आकडेवारीनुसार ती काहीशी कमी होत १७.९८ रुपये पेट्रोलसाठी आणि १५.३३ रुपये डिझेलसाठी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यात वाढ झाली आहे.