जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. अनेक देशांमध्ये करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. अमेरिकाही याला अपवाद नाही. सुरुवातीपासून करोना विषाणूचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसल्याचं दिसतंय. अमेरिकेत आत्तापर्यंत जगभरात सर्वाधिक करोना मृत्यूंची नोंद झाल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. अमेरिकेने ८ लाख मृत्यूंचा आकडा पार केल्याचं या अभ्यासात म्हटलंय. तब्बल २ लाख मृत्यू हे लसीकरण मोहिम सुरू करण्यात आल्यानंतर झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीये. त्यातच आता गुगल कंपनीने महत्वाचा निर्णय घेतलाय.
गुगलने आपल्या कर्मचार्यांना इशारा दिलाय की, करोनाविरोधातील लसीकरणाच्या नियमांचं पालन न केल्यास ते त्यांचा पगार गमावतील अन्यथा त्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल. सीएनबीसीने मंगळवारी अंतर्गत कागदपत्रांचा हवाला देऊन ही माहिती दिली आहे.
गुगलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारित केलेल्या मेमोमध्ये असे म्हटले होते की, “कर्मचार्यांना ३ डिसेंबरपर्यंत त्यांची लसीकरणाची स्थिती कंपनीला सांगणे आणि पुरावा दर्शविणारी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. त्या तारखेनंतर, कंपनी अशा कर्मचार्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात करेल ज्यांनी लसीकरणाबद्दल माहिती दिली नाही किंवा लसीकरण केलेले नाही. जे कर्मचारी १८ जानेवारीपर्यंत लसीकरणाच्या नियमांचे पालन करणार नाही, त्यांना ३० दिवसांसाठी कंपनीकडून पगारी सुट्टीवर पाठवले जाईल. त्यानंतर सहा महिने त्यांना बिनपगारी रजेवर पाठवण्यात येईल आणि नंतर कामावरून काढलं जाईल.”
रॉयटर्सने संपर्क साधला असता, गुगलने सीएनबीसीच्या अहवालावर थेट कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु ते म्हणाले, “आम्ही आमच्या कर्मचार्यांना लसीकरणात मदत करण्यासाठी आणि आमच्या लसीकरण धोरणात सहकार्य करण्यासाठी शक्य ते सर्व काही करण्यास वचनबद्ध आहोत.”