पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी उत्तर प्रदेशात पोहोचले होते. यावेळी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली तसंच गंगेत डुबकी घेत पवित्र स्नान केलं. यानंतर त्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडोर प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. दरम्यान यानंतर त्यांनी या प्रोजेक्टसाठी काम करणाऱ्या बांधकाम कामगारांसोबत जेवण केलं. नरेंद्र मोदींचा मजुरांसोबत जेवायला बसलेला फोटो चांगलाच चर्चेत आला होता.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या फोटोवरुन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. नाना पटोले यांनी ट्विटरला दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा एक फोटो शेअर करत तुलना केली आहे.
“मजुरांसोबत सहज जेवायला बसणे आणि उच्च दर्जाची व्यवस्था करुन इव्हेंट करणे यातील फरक,” असं ट्वीट करत नाना पटोले यांनी टोला लगावला आहे.
दरम्यान नाना पटोले यांच्या ट्वीटवर अनेकांनी नाराजी जाहीर करत त्यांना ट्रोल केलं आहे. “नानासाहेब तेव्हाच्या जेवणाची पद्धत,आता गावात सुद्धा नाही उरली,” असं एका युजरने म्हटलं आहे.
“फक्त निवडक लोकांना जेवण देऊन… इव्हेंट तर राजीव गांधींनी केला….!,” असं एकाने म्हटलं आहे.
१. काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्प हा वाराणसीचं काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगेचे घाट यांना जोडणारा ठरणार आहे.
२. या प्रकल्पामुळे वाराणसीतल्या या पवित्र धार्मिक स्थळाला भेट देणाऱ्या हजारो-लाखो भाविकांची सोय होणार आहे. घाट आणि मंदिरं यांच्यातलं अंतर पार करण्यात या प्रकल्पामुळे मोठी मदत होणार आहे. याआधी भाविकांना मंदिरांमध्ये जाण्यासाठी अगदी अरुंद बोळांमधून प्रवास करावा लागत होता.
३. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. हा पहिला टप्पा साधारण ३३९ कोटींचा असून याचा विस्तार ५ लाख चौरस फूटांत पसरलेला आहे. यात २३ इमारतींचा समावेश आहे.
४. या प्रकल्पाची पायाभरणी २०१९ मध्येच करण्यात आली होती. या प्रकल्पाला साधारण ८०० कोटी रुपये खर्च येणार आहे. या भव्य दिव्य प्रकल्पासाठी ३०० हून अधिक जागा हेरण्यात आल्या आहेत. १४०० दुकानदार, भाडेकरु, घरमालक यांचं विस्थापन करण्यात आल्याचं पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं आहे.
५. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ४० हून अधिक प्राचीन मंदिरं या प्रकल्पाच्या कामादरम्यान आढळून आली आहेत. या मंदिरांच्या मूळ रचनेत कोणताही बदल न करता त्यांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.