दिल्लीच्या सीमारेषांवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची आता सांगता झाली आहे. सर्व शेतकरी आपापल्या घरी परतले आहेत. मात्र, अजूनदेखील केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांना आपल्या गाडीने चिरडल्याचं प्रकरण शमलेलं नाही. या मुद्द्यावरून काँग्रेसनं सत्ताधारी भाजपावर टीका करणं सुरूच ठेवलं असून संबंधित मंत्र्यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यासोबतच त्यांना तुरुंगात पाठवण्याची मागणी काँग्रेसनं तीव्र केली आहे. या मुद्द्यावरून सध्या देशातलं वातावरण तापलेलं असतानाच काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आता मोदी सरकारला इशारा दिला आहे.
लखीमपूर खेरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने हा प्रकार म्हणजे पूर्वनियोजित कट होता, असा निर्वाळा आपल्या अहवालात दिल्यानंतर यावरून मोदी सरकारवर दबाव वाढू लागला आहे. केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचा मुलगा आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपी आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांनी जाणूनबुजून शेतकऱ्यांना गाडीने चिरडण्याचं कृत्य केल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यावरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
“जेव्हा मी लखीमपूर खेरीला गेलो, मी संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना वचन दिलं होतं की काहीही झालं, तरी आम्ही केंद्र सरकारवर दबाव टाकून त्यांना न्याय देऊ. अर्थात, न्याय हा दबाव आणि संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही. काँग्रेसनं सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की तीन कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील आणि ते मागे घेतले गेले. त्याचप्रमाणे मी म्हणतोय की केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांना राजीनामा द्यावाच लागेल. ते तुरुंगात जाईपर्यंत आम्ही केंद्र सरकारवर दबाव टाकत राहू. मग भले त्यासाठी ५, १० किंवा १५ वर्ष लागोत. ते तुरुंगात जाईपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले आहेत.
“हा एक कट होता. एखादा अपघात नव्हता. हा कट कुणी रचला हे अगदी उघड आहे. या प्रकरणावर संसदेत चर्चा व्हावी, अशी काँग्रेसची मागणी होती. काँग्रेसनं केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. पण केंद्र सरकार यावर चर्चा करायला तयार नाही”, असा आरोप राहुल गांधींनी केला.