“हिंमत दाखवा, आमच्याशी लढा”, अशा शब्दांमध्ये राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतीने सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यामाधील कार्यक्रमामधून थेट आव्हान दिलं. या आव्हानाला शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. शाह यांनी केलेल्या टीकेनंतर पक्षाची भूमिका मांडताना राऊत यांनी भाजपाला थेट लढाई लढावी असं आव्हान केलं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे ठरले होते. मात्र सत्तेसाठी शिवसेनेने वचन मोडले. मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्व सोडले. ज्यांच्याबरोबर दोन पिढ्या वाद घातला त्यांच्या मांडीवर जाऊन शिवसेना बसली, अशा शब्दांत शहा यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुणे शहरातील बूथ प्रमुखांचा मेळावा आणि बूथसंपर्क अभियान गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रविवारी आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेवर सडकून टीका केली.
शाह काय म्हणाले?शहा म्हणाले, ‘‘मुख्यमंत्रिपदावरून मी वचन मोडले, असा आरोप केला जातो. विधानसभा निवडणुकीवेळी मी राज्यात आलो होतो. त्या वेळी शिवसेनेबरोबर चर्चा झाली होती. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, असे त्या वेळी ठरले होते. मात्र सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाशी तडजोड केली. सत्तेसाठी शिवसेना विरोधकांच्या मांडीवर जाऊन बसली.’’
थेट लढण्याचं आव्हान…मी खोटे बोललो होतो, असे काही क्षण गृहीत धरले तर प्रत्येक भाषणात मोदींचे नाव का घेण्यात येते होते, जाहिरात फलकांवर मोदींचे छायाचित्र किती मोठे लावण्यात आले होते, हे आठवावे. मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून विश्वासघात करण्यात आला, असा आरोपही शहा यांनी केला. सत्ता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे शिवसेनेला वाटत आहे, असा टोलाही शाह यांनी लगावला. तसेच शिवसेनेनं भाजपाशी थेट दोन हात करावेत असं आव्हानच शाह यांनी आपल्या भाषणामधून दिलं.
राऊत यांनी दिलं उत्तर…शाह यांच्या या आव्हानाला उत्तर देताना संजय राऊत यांनी केंद्र सरकार तीन चिलखतं घालून लढत असल्याचा टोला लगावला. “सीबीआय, ईडी, एनसीबी ही तीन चिलखतं घालून तुम्ही महाराष्ट्रात आमच्याशी लढतायत. ती तीन चिलखतं काढून समोरुन लढा,” असं राऊत यांनी शाह यांच्या ‘हिंमत दाखवा, आमच्याशी लढा’ या आव्हानाला उत्तर देताना म्हटलंय. आम्ही अंगावर वार झेलणारे आहोत. शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आहे. आम्ही समोरुनच लढतो आणि लढणार, असंही राऊत शाह यांच्या आव्हानाला उत्तर देताना म्हणालेत.