गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर ताब्यात घेण्यात आलेल्या एका मासेमारी करणाऱ्या बोटीमधून तब्बल ४०० कोटी रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एनसीबीवर आणि अप्रत्यक्षपणे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर निशाणा साधलाय. पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांना ४०० कोटींच्या अमली पदार्थांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राऊत यांनी आर्यन खान प्रकरणाचा उल्लेख करतानाच पंतप्रधानांनी गुजरात संदर्भात काळजी घेतली पाहिले अशा आशयाचं वक्तव्य केलं.
घडलं काय?गुजरातच्या किनाऱ्यावर सोमवारी (२० डिसेंबर २०२१ रोजी) पाकिस्तानमधून आलेली मासेमारी करणारी बोट पकडण्यात आली. या बोटमधून तब्बल ४०० कोटी रुपये किमतीचे ७७ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. ‘अल हुसेनी’ नावाच्या या बोटमध्ये सहा क्रू सदस्य होते. ही बोट भारतीय जलक्षेत्रात पकडण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षण जनसंपर्क कार्यालयाने सोमवारी दिली. भारतीय तटरक्षक दलाने गुजरात दहशतवादविरोधी पथकासह संयुक्तरित्या ही कारवाई केली.
राऊत काय म्हणाले?“मला असं वाटतं की आर्यन खानला वगैरे पकडून तमाशा करणारे, नवाब मलिक यांच्या जावयाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणारे जे मुंबईमधील एनसीबीचे गाजलेले अधिकारी आहेत त्यांना गुजरातची जबाबदारी दिली पाहिजे,” असं राऊत यांनी या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं. राऊत यांनी आपल्या या वक्तव्यावरुन आर्यन खान प्रकरणामुळे चर्तेत आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
मोदींनी लक्ष घालण्याची गरज…पुढे बोलताना राऊत यांनी पंतप्रधान मोदींनी गुजरातसंदर्भात विशेष लक्ष घातलं पाहिजे असंही म्हटलं. “गुजरात हे अमली पदार्थाच्या वाहतुकीचं, सेवनाचं सर्वात मोठं पोर्ट झालेलं दिसत आहे. ही गंभीर गोष्ट आहे. संपूर्ण देशाला एखाद्या नशेत गुंग करण्यासाठी गुजरातच्या भूमीचा वापर होतोय का यासाठी पंतप्रधानांनी विशेष लक्ष घालण्याची गरज आहे,” असं राऊत म्हणाले.
यापूर्वीही गुजरातमध्ये आढळल्यात अमली पदार्थांच्या बोटीदरम्यान, गुजरातच्या किनाऱ्यावर ताब्यात घेण्यात आलेली ही बोट पुढील तपासासाठी कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर आणण्यात आलीय. या वर्षी एप्रिलमध्ये, तटरक्षक दल आणि एटीएसने अशीच कारवाई केली होती आणि कच्छमधील जाखाऊ किनार्याजवळील भारतीय पाण्यावरून आठ पाकिस्तानी नागरिकांसह आणि सुमारे १५० कोटी रुपये किमतीचे ३० किलो हेरॉईन असलेली बोट पकडली होती.
६०० कोटींचे ड्रग्ज जप्त…गेल्या महिन्यात एटीएसने गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका बांधकामाधीन घरातून सुमारे ६०० कोटी रुपयांचे हेरॉईन ड्रग्जची खेप जप्त केली होती. पाकिस्तानी ड्रग्ज विक्रेत्यांनी ही खेप अरबी समुद्रमार्गे त्यांच्या भारतीय समकक्षांना पाठवली होती, असे एटीएसने म्हटले होते.
मुंद्रा बंदरात ३ हजार किलो ड्रग्जया वर्षी सप्टेंबरमध्ये, कच्छमधील मुंद्रा बंदरात भारतातील सर्वात मोठ्या हेरॉईनचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केला होता. दोन कंटेनरमधून सुमारे ३ हजार किलो ड्रग्ज जप्त केले होते. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत २१ हजार कोटी रुपये होती.