पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी सध्या पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे राज्यात पालिका निवडणुकांमधील निकाल आज जाहीर होत आहेत. ममता बॅनर्जींच्या राजकीय वाटचालीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची असून विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीतही मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा आपलं राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. दरम्यान सुरुवातीचे कल आले आहेत त्याप्रमाणे ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा भाजपाला जोरदार दणका दिला आहे.
कोलकाता महापालिका निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजयी वाटचाल सुरु केली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार तृणमूल १३४ जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे भाजपा ३, डावे ४ आणि काँग्रेस फक्त दोन जागांवर आघाडीवर आहे.
सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आले आहे. तसंच २०० मीटर परिसरात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना २०० मीटरच्या अंतरात प्रवेश करण्याची परवानगी नाही. सुरक्षेची पूर्ण जबाबदारी कोलकाता पोलिसांकडे आहे. याशिवाय करोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर उपस्थितांना दोन्ही लस घेतलेलं असणं अनिवार्य आहे.
१९ डिसेंबरला निवडणुकीसाठी जवळपास ६४ टक्के मतदानाचीच नोंद झाली होती. गेल्या वेळचा निकाल पहायला गेल्यास २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला १४४ पैकी १४४ वॉर्ड्समध्ये विजय मिळाला होता. दुसऱ्या स्थानी सीपीएम होतें. सीपीएमला २०१० मधील ३३ जागांच्या तुलनेत २०१५ मध्ये फक्त १५ जागा मिळाल्या होत्या.
भाजपाला ७ जागा मिळाल्या होत्या. २०१० च्या तुलनेत फक्त तीन जागांची वाढ होती. तर काँग्रेसला २०१० मध्ये मिळालेल्या ८ जागांच्या तुलनेत २०१५ मध्ये ५ जागा मिळाल्या होत्या.
भाजपा आणि सीपीएमने पालिका निवडणुकीत हिंसाचार आणि घोटाळा झाल्याचा आरोप करत हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. याप्रकरणी २३ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. भाजपा, काँग्रेस आणि सीपीएमने पालिका निवडणूक रद्द करत पुन्हा एकदा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.