पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी राज्यातील काँग्रेसचे सर्व आमदार वाळूच्या अवैध व्यापारात गुंतले असल्याचा आरोप केला. परंतु आपण कोणाचीही नावे सार्वजनिक करणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.“ कोण सहभागी आहे याऐवजी कोण सहभागी नाही हे विचारा. मी नावं सांगायला सुरुवात केली तर वरून सुरुवात करावी लागेल. मला ते करायचे नाही,” असंही ते हसत म्हणाले. पारोल गावातील मोहिंदर बाग येथील त्यांच्या फार्महाऊसवर निवडक माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
बेकायदेशीर वाळू उत्खननात गुंतलेल्या आमदारांची यादी तयार करून त्यांना बोलावणार का या प्रश्नाला अमरिंदर उत्तर देत होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सांगितले होते की त्यांच्या पक्षाचे अनेक आमदार अवैध वाळूच्या व्यापारात गुंतल्याचे अहवाल त्यांच्याकडे आहेत. पंजाब विधानसभेच्या अधिवेशनातही त्यांनी याच गोष्टीचा पुनरुच्चार केला होता.
माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी बुधवारी पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावरही हल्ला चढवला आणि ते म्हणाले की पवित्र ग्रंथांची विटंबना करणाऱ्यांना रस्त्याच्या मधोमध फाशी द्यावी, असे म्हणणे त्यांच्यासाठी अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. ते म्हणाले की, नुकत्याच घडलेल्या अपवित्र घटनांमध्ये धार्मिक धर्तीवर लोकांचे ध्रुवीकरण करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे राज्यात अशांतता आणि संकट निर्माण होऊ शकते.