अमेरिकेमध्ये करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा धोका वाढत असतानाच आता करोनासंदर्भातील मोठा घोटाळा समोर आलाय. अमेरिकेतील सिक्रेट सर्व्हिसने सादर केलेल्या अहवालामध्ये करोना मदतनिधीमध्ये १०० अब्ज डॉलर्सचा घोटाळा झालाय. करोना मदतनिधीमधील १०० अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे साडेसात लाख कोटी रुपये चोरीला गेल्याचा दावा करण्यात आलाय.
बेरोजगारीसंदर्भातील भत्त्यामध्ये मोठी रक्कम लाटण्यात आल्याचा दावा अमेरिकेतील कामगार विभागाने केलाय. बेरोजगारांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या रक्कमेबरोबर कर्जाच्या नावाखाली फसवणूक करुन मिळवलेल्या रक्कमेमधून १.२ बिलियन अमेरिकन डॉलर्सची रक्कम विभागाने परत मिळवली आहे. तर फसणवूक करुन मिळवलेले २.३ बिलियन अमेरिकन डॉलर्सही विभागाने यशस्वीपणे परत मिळवलेत. करोना कालावधीमध्ये बेरोजगार असल्याचं सांगून सरकारी मदत घेणारी ९०० हून अधिक प्रकरण तपासामध्ये समोर आली आहेत. यापैकी काहीजणांकडून पैशांची वसूली करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.
अमेरिकेतील न्याय विभागाने आतापर्यंत १५० जणांविरोधात कारवाई करुन ७५ मिलियन अमेरिकन डॉलर्सची वसूली केलीय. करोना कालावधीमध्ये मदत म्हणून गरजूंना सरकारकडून देण्यात येणारे पैसे या योजनेअंतर्गत पात्र नसलेल्यांनी फसवणूक करुन मिळवल्याचं तपासात स्पष्ट झालंय.
करोना कालावधीमध्ये फसणूक करुन सरकारी मदत मिळवणाऱ्या ३० जणांविरोधात आम्ही कारवाई केलीय असं जेसिका आर्बर यांनी सांगितलं आहे. जेसिका या व्हर्जेनिया राज्याच्या अटॉर्नी म्हणून कार्यरत आहेत. अमेरिकन सरकारने सुरु केलेल्या पे चेक प्रोटेक्शन प्रोग्राम (पीपीपी), इकनॉमिक इंज्युरी डिझास्टर लोन (ईआयडीएल) आणि अनएम्प्लॉमेंट इन्शुअर्न्स (युआय) या तीन योजनांअंतर्गत घोटाळे झाल्याचं उघड झालंय.
पीपीपी योजनेअंतर्ग अनेक छोट्या उद्योजकांनी सरकारकडून खोटी कागदपत्रं दाखवून कर्जाची रक्कम घेतल्याचं स्पष्ट झालंय. तर युआय योजनेमध्ये लोकांची ओळखपत्रं चोरणाऱ्यांनी पैसे मिळवल्याचं स्पष्ट झालंय.