जगभरात भारतीय महिला वेगाने प्रगतीची शिडी चढत आहेत. त्याचबरोबर यावर्षी अनेक भारतीय महिलांनी आपल्या कौशल्याने देशाचे नाव जगभरात पुढे नेले आहे. हरनाज कौर संधूने अलीकडेच मिस युनिव्हर्स २०२१ चा खिताब जिंकून देशासाठी मोठी कामगिरी केली. तर लीना नायरने फॅशन ब्रँड चॅनलची सीईओ बनून एक उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. त्याचवेळी वर्षअखेरीस मुंबईत राहणाऱ्या आम्रपाली (एमी) गाननेही देशाला एक भेट दिली आहे.
अॅडल्ट कंटेंट क्रिएशन प्लॅटफॉर्म ओन्ली फॅन्सने (OnlyFans) भारतीय वंशाच्या आम्रपाली ‘एमी’ गानची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे. ओन्लीफॅन्सचे संस्थापक ३८ वर्षीय टिम स्टोकली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. २०१६ मध्ये टिमने ओन्लीफॅन्सची स्थापना केली. तेव्हापासून ते पाच वर्षे या पदावर कार्यरत होते. नवीन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्याआधी सुट्टीचा आनंद घ्यायचा असल्याने ते पद सोडत असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्रपाली यांच्याकडे सीईओ पद सोपवत टिम स्टोकलीने सांगितले की, “ती खूप चांगली सहकारी तसेच माझी एक चांगली मैत्रिण आहे. मी एका मैत्रिणीला जबाबदारी सोपवत आहे जिच्याकडे दूरदृष्टी आहे आणि संस्थेला तिच्या प्रचंड उंचीपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी क्षमता आहे.”
२०२० मध्ये ओन्लीफॅन्ससोबत जोडली गेली आम्रपाली
आम्रपालीने यापूर्वी रेड बुल आणि क्वेस्ट न्यूट्रिशनसाठी काम केले आहे. २०२० मध्ये ती या कंपनीशी चीफ मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स ऑफिसर म्हणून जोडली गेली होती. आम्रपाली म्हणते, “या सन्मानाबद्दल मी कंपनीचे आभार मानते. मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडेन आणि माझ्या सहकाऱ्यांसोबत काम करेन. मला खूप अभिमान आहे की कंपनीने माझ्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.”
ओन्लीफॅन्स प्लॅटफॉर्मबद्दल एक समज आहे की येथे फक्त अॅडल्ट आणि अश्लील कंटेंट उपलब्ध आहे. पण सत्य काही वेगळे आहे. या प्लॅटफॉर्मवर सेलिब्रिटी चाहत्यांशी जोडण्यासोबतच अनेकांनी करोडो रुपये कमावले आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री बेला थॉर्न ही या प्लॅटफॉर्मवरवरील सर्वाधिक चर्चेत असलेली एक आहे. जेव्हा बेलाने एका दिवसात एक दशलक्ष डॉलर्स कमावले होते, तेव्हा ओन्लीफॅन्स प्लॅटफॉर्मला त्यांचे धोरण बदलावे लागले होते.
याशिवाय पॉप स्टार कार्डी बी, प्रसिद्ध रॅपर टायगा, हॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता मायकल जॉर्डन यांसारख्या अनेक प्रसिद्ध स्टार्सनी या प्लॅटफॉर्मद्वारे करोडो रुपये कमावले आहेत. ओन्लीफॅन्सचे १८० दशलक्ष नोंदणीकृत यूजर्स आहेत. जगभरात दोन दशलक्षाहून अधिक निर्माते आहेत.