उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या विरोधी पक्षावर म्हणजे समाजवादी पार्टीवर कायमच टीका करत असतात. आता त्यांनी समाजवादी पार्टीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला असून त्यांनी खाल्लेला पैसा लपवून ठेवला आहे, तो आता बाहेर येऊ लागला असल्याची टीका केली आहे. मागच्या सरकारने जनतेला लुटलं, मात्र हे सरकार आता जनतेचा पैसा कल्याणकारी योजनांसाठी वापरत आहे, असंही योगी म्हणाले.
केंद्रीय तपास यंत्रणांनी कानपूरस्थित व्यावसायिक पीयूष जैन यांच्या मालमत्तेवर छाड टाकली आणि १७७ कोटींहून अधिक रोख रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, सध्या भारतीय जनता पार्टीचं दोन इंजिन असलेलं सरकार अधिक प्रभावीपणे काम करत आहे. पण दरम्यान तुम्ही पाहात असाल की जे ५ वर्षांपासून सत्तेबाहेर आहेत, आजही त्यांनी लपवून ठेवलेले कोट्यवधी रुपये बाहेर पडत आहेत. सध्या केंद्र आणि राज्य सरकार जनतेला मोफत जेवण देत आहे. या आधीच्या सरकारने हाच पैसा भ्रष्टाचार करण्यासाठी वापरला.
कौशंबी इथं झालेल्या जनविश्वास यात्रेदरम्यान रविवारी त्यांनी सभेला संबोधित केले.
विरोधी पक्षाने करोना प्रतिबंधक लसींना विरोध करून मानवतेविरोधात गुन्हा केल्याची टीकाही योगी यांनी समाजवादी पार्टीवर केली आहे. ते म्हणाले, जे करोना प्रतिबंधक लसीकरणाला विरोध करत आहेत, ते मानवतेविरोधात गुन्हा करत आहेत आणि करोनाशी मैत्री करत आहेत. त्यांना गरीबांची काळजी नाही. जेव्हा त्यांच्या हातात संधी होती, तेव्हा त्यांनी काहीही केलं नाही. म्हणून आता जेव्हा ते सत्तेत नाहीत, तेव्हा ते चुकीच्या माहितीच्या आधारे लोकांच्या जीवाशी खेळत आहेत.