देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी लखनऊमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र युनिट आणि संरक्षण तंत्रज्ञान आणि चाचणी केंद्राच्या (DRDO) प्रयोगशाळेची पायाभरणी केली. या कार्यक्रमातील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते तोंडावर बंदुक घेऊन निशाणा साधताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा फोट शेअर करण्यात आला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र युनिट आणि लॅब ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी अँड टेस्टिंग सेंटर (DRDO) च्या पायाभरणी समारंभात संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “लखनौ आता ‘अतिथी देवो भव:’ या भावनेने शत्रू देशाविरुद्ध गर्जना करेल.” दरम्यान, कालपासून सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची नव्हे तर त्यांच्या फोटोची चर्चा रंगली आहे.
एका युजरने म्हटलं की, ‘तोंडाजवळ रायफल धरून नेम कोण लावतं?’, तर ‘बंदुक पकडण्यासाठी ही कोणती नवी पद्धत शोधली गेली याचा विचार आज सैनिक करत असतील,’ असं म्हणत एकाने निशाणा साधला
दरम्यान, यापूर्वी योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, “नवा भारत कुणाला कुरापती करत नाही, पण कोणी कुरापती केल्या तर सोडत देखील नाही. त्यामुळे केंद्र सरकारने गेल्या ७ वर्षात वेळोवेळी केलेल्या कारवाया सर्वश्रुत आहेत. लखनऊमध्ये उत्पादित क्षेपणास्त्रे केवळ संरक्षण क्षेत्राच्याच गरजाच पुरवणार नाहीत तर भारताच्या सीमा रेषा आणखी मजबूत करतील आणि रोजगाराचे एक उत्तम माध्यम बनतील.”
संरक्षण मंत्र्यांकडून योगींचं कौतुक…
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीएम योगी यांचे जोरदार कौतुक केले. राजनाथ सिंह म्हणाले, “जेव्हा मी दुसऱ्या राज्यात जातो, तेव्हा लोक म्हणतात की योगी सरकार, खूप प्रभावी आहे. युपीचे मुख्यमंत्री कितीही दबाव आला तरी माफियांना सोडत नाहीत. इथे आता गुन्हेगार राहिलेले नाहीत.
पुढे ते म्हणाले, “आम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, इतर संरक्षण उपकरणे आणि शस्त्रे बनवत आहोत. पण आम्ही ती कोणत्याही देशावर हल्ला करण्यासाठी बनवत नाही आहोत. आम्हाला ब्रह्मोस बनवायचा आहे जेणेकरून भारतात किमान एवढी शक्ती असली पाहिजे की जगातील कोणताही देश भारताकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही.”