उत्तर प्रदेशमध्ये २०२२मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोमाने प्रचार करताना दिसत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी आणि मतदारांना प्रभावित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून एकमेकांवर टीका करताना आणि आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. भाजपाकडून तर अनेक विकासकामांची पायाभरणी केली जात आहे आणि केंद्रीय मंत्री देखील राज्यात सभा घेताना दिसत आहेत. अशातच योगी आदित्यनाथ सरकारमधील एका मंत्र्यांचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. या मंत्र्याने खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आले तर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी हिंदूंचा पवित्र धागा जानवं घालतील आणि प्रभू रामाच्या नावाचा जप करतील,” असे वक्तव्य उत्तर प्रदेशातील एका मंत्र्याने रविवारी केले. राज्यात भाजपाची विचारधारा बळकट होत असताना ओवेसी जानवं घालणाऱ्या राहुल गांधी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेणाऱ्या अखिलेश यादव यांच्यासारख्या नेत्यांच्या पंक्तीत बसतील, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे पंचायत राज मंत्री भूपेंद्र सिंह चौधरी यांनी केले
ओवेसी कधीपासून जानवं घालू लागतील, असा सवाल केला असता भूपेंद्र सिंह यांनी टीका केली. ते म्हणाले, “आम्ही आमचा अजेंडा पुढे नेत आहोत. याच अजेंडामुळे अखिलेश यादव यांनी हनुमान मंदिरात जाऊन प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. याच अजेंडामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जानवं परिधान करण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांचे ‘गोत्र’ सर्वांना सांगण्यास सुरुवात केली आहे. हाच आमच्या विचारसरणीचा प्रभाव आहे. ज्यामुळे लोकांनी स्वतःचे अजेंडा सोडले आणि आमचे अनुकरण करण्यास सुरुवात केली,” असं ते म्हणाले.
“जे लोक लोकांची विभागणी करण्यात गुंतले होते आणि केवळ अल्पसंख्याकांबद्दल बोलत होते, ज्यांना प्रभू रामाचे अस्तित्व मान्य नव्हते आणि ज्यांनी राम ही काल्पनिक व्यक्तिरेखा असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले होते, त्यांनी आता जानवं परिधान करून मंदिरांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे,” असा दावा त्यांनी केला.