उत्तरप्रदेश पोलिसांना सध्याच्या तरुणाईची आणि सोशल मीडियाची नस चांगलीच पकडता येते याचा अनुभव आता पुन्हा एकदा आला आहे. माध्यमांमध्ये ट्रेंडिंगवर असणाऱ्या विषयांचा वापर करून जनजागृती कशी करायची याचं उत्तम उदाहरण उत्तरप्रदेश पोलिसांनी दिलं आहे. त्यांनी करोना प्रतिबंधक नियमावलीचं पालन करण्यासंदर्भात जागृती करण्यासाठी सध्या चर्चेत असलेला सलमान खान आणि त्याचे काही डायलॉग्स वापरले आहेत. जगभरात करोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रभाव वाढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश पोलीस हटके पद्धतीने जनजागृती करत आहेत.
अभिनेता सलमान खान याचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्ताने सोशल मीडियावर सलमान खानचीच चर्चा होती. तर #BhaiKaBirthday, #HBDSalman असे हॅशटॅग्जही ट्विटवर ट्रेंड होत होते. याचाच उपयोग करून उत्तरप्रदेश पोलिसांनी सलमान खानच्या चित्रपटांमधले संवाद, त्यांची नावं यांचा कल्पकतेने उपयोग केला आहे आणि त्याद्वारे पोलिसांनी मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर राखणे अशा नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
उत्तरप्रदेश पोलिसांनी ट्विटरवर सलमान खानचा मास्क घातलेला एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर एक ओळ लिहिली आहे. हा सलमान खानचाच एक प्रसिद्ध डायलॉग आहे. हा डायलॉग असा – आयुष्यात तीन गोष्टींना कधीच कमी लेखू नका, मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर (जिंदगी में तीन चिजे कभी अंडरइस्टिमेट मत करना- मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग)
यासोबतच त्यांनी सलमान खानच्या काही चित्रपटांची नावं एकत्र करून एक कल्पक ट्वीट करत हा फोटो शेअर केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये उत्तरप्रदेश पोलीस म्हणतात, व्हायरससोबत चाललेल्या कुस्तीमध्ये या तीन गोष्टीच ‘अंतिम’पर्यंत ‘बॉडीगार्ड’ बनून राहणार आहे. सतर्क राहा आणि सुरक्षेचा ‘सुलतान’ बनून ‘भारत’ देशात करोनाच्या ‘दबंगा’ईला हाकलून(‘किक’) लावा.