देशात करोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढत आहेत. धोकादायक करोना व्हायरस थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे. देशात रुग्ण बरे होण्यापेक्षा अडीच पटीने अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशात कोविड-१९ चे २२,७७५ नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय ८,९४९ रुग्ण करोना संसर्गातून बरे झाले आहेत. तसेच एकूण ४०६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटची सातत्याने आढळून येत आहेत. सध्या देशात या प्रकाराची एकूण १,४३१ प्रकरणे आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख चार हजार ७८१ झाली आहे. तसेच करोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ४ लाख ८१ हजार ४८६ झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत तीन कोटी ४२ लाख ७५ हजार ३१२ लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत १४५.१६ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशात दररोज या विषाणूची लागण होण्याचे प्रमाण २.०५ टक्के आहे. त्याच वेळी, दर आठवड्याला १.१० टक्के दराने लोकांना या संसर्गाची लागण होत आहे.
दरम्यान, देशात आतापर्यंत १४३१ लोकांना ओमायक्रानची लागण झाली आहे. देशात या प्रकाराची लागण झालेल्या राज्यांची संख्या २३ झाली आहे. सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीत आहेत. यानंतर तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ४५४, दिल्लीत ३५१ आणि तामिळनाडूमध्ये ११८ लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे.