देशभरातील करोना रुग्णांची संख्या या आठवड्याच्या सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. दैनंदिन अवघे ५ हजार रुग्ण सापडत होते, तो आकडा सध्या २५ हजारांच्या पार गेल्याचं दिसतंय. देशात फक्त करोना रुग्णच नाही तर ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढू लागली आहे. देशात गेल्या २४ तासांत २७ हजार ५५३ करोना रुग्ण आढळले असून २८४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर देशभरातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या १५२५वर पोहोचली आहे.
भारतातील २३ राज्यांमध्ये आत्तापर्यंत वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन प्रकाराच्या रुग्णांची नोंद केली गेली आहे. ओमायक्रॉन बाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात ४६० रुग्ण असून पाठोपाठ दिल्लीमध्ये ३५१ रुग्ण आहेत. गुजरातमध्ये गेल्या २४ तासांत २१ नवीन ओमायक्रॉन बाधित आढळले असून एकूण प्रकरणं १३६वर पोहोचली आहेत. तर, तामिळनाडू चौथ्या क्रमांकावर असून इथे ११७ रुग्ण आणि केरळमध्ये १०९ रुग्ण आहेत.
भारतातील करोनाबाधितांची एकूण संख्या सध्या ३,४८,८९,१३२ आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या पॉझिटीव्हीटी रेट २.५५ टक्के आहे. आकडेवारीवरून असे दिसून येत आहे की, राजधानी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यासारख्या मोठ्या दाट लोकवस्तीच्या महानगरांमध्ये करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.