नवी दिल्ली - जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन हा व्हेरियंटचा धोका वाढत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी विविध निर्बंध लादले जात आहेत. एवढेच नाही तर कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटला सामोरे जाण्यासाठी सातत्याने संशोधन करण्यात येत आहे. यातच ओमायक्रॉनसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. वेगाने पसरणारा ओमायक्रॉन हा व्हेरियंट फुफ्फुसांना जास्त लक्ष्य (Omicron is not fatal) करत नसल्याचे समोर आले आहे.
नुकत्याच झालेल्या संशोधनाचा हवाला देत माध्यमांनी ही माहिती दिली आहे. उंदीर आणि इतर लहान जीवांवर केलेल्या संशोधन अभ्यासातून हे दिसून आले आहे. ओमायक्रॉन हा फुफ्फुसांना जास्त नुकसानदायक ठरत नाही आणि त्याचा परिणाम नाक, घसा आणि श्वासोच्छवासावर होतो. पूर्वीच्या कोरोना प्रकारांमुळे फुफ्फुसांमध्ये चट्टे तयार होऊन श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
नागरिकांनी भीती बाळगू नये -
ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात ( Coronavirus In Maharashtra ) आहेत. इतर राज्यातदेखील ओमायक्रॉनची रुग्ण दिसून येत आहेत. विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत नागरिकांनी भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात मास्क घालणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे, गर्दीत न जाणे या कोविड नियमांचे पालन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनी त्याची माहिती स्थानिक आरोग्य विभागास द्यावी, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली -
कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग पसरू नये, म्हणून अनेक राज्यांनी लॉकडाऊन, निर्बंध आणि नाईट कर्फ्यू लागू केला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातदेखील नाईट कर्फ्यू लागू करण्याची शक्यता आहे. तर तेलंगणामध्ये काही ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत.